कोकण रेल्वेस राजभाषा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांचे प्रमाण अवघे २.७ टक्के असूनही कोकण रेल्वेने राजभाषा कीर्ती पुरस्कारावर दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. याचे वितरण गुरुवारी (ता. १४) राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

सावंतवाडी - हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांचे प्रमाण अवघे २.७ टक्के असूनही कोकण रेल्वेने राजभाषा कीर्ती पुरस्कारावर दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. याचे वितरण गुरुवारी (ता. १४) राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

केंद्राच्या बहुसंख्य शासकीय कामकाजामध्ये इंग्रजीचा वापर होतो; मात्र ही भाषा सर्वसामान्यांना तितक्‍या प्रभावीपणे समजतेच असे नाही. यामुळे केंद्रातर्फे शासकीय कामकाजामध्ये हिंदी या राजभाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण आहे. केंद्राच्या अखत्यारीतील विविध शासकीय विभागामध्ये हिंदी राजभाषेचा प्रभावी वापर करणाऱ्या विभागांना दरवर्षी सन्मानित केले जाते. यात विविध विभागांमध्ये पुरस्कार असतात. हा पुरस्कार देताना क क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक राज्यांचा तर ख क्षेत्रामध्ये हिंदी ही मुख्य दैनंदिन वापरातील भाषा नसलेल्या भागाचा समावेश होतो. कोकण रेल्वेला केंद्राच्या ख क्षेत्रामध्ये पीएसयू उपक्रमामध्ये राजभाषेचे प्रभावी काम केल्याबद्दल तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. यात कोकण रेल्वेने विविध कामकाजामध्ये हिंदी भाषेच्या केलेल्या वापराचे मूल्यमापन केले. याचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. 

कोकण रेल्वेमध्ये हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी म्हणजे अवघी २.७ टक्के आहे. इतर कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील रहिवाशांचा समावेश आहे, असे असूनही हा पुरस्कार मिळविणे विशेष ठरले आहे. या आधीही कोकण रेल्वेने हा पुरस्कार मिळविला होता.

हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असूनही कोकण रेल्वेने मिळविलेले हे यश कौतुकास पात्र आहे. सर्व कर्मचाऱ्यांसह पूर्ण यंत्रणेच्या प्रभावी कामाचे यातून चीज झाले. हा सन्मान आमच्या सगळ्या टीमसाठी उत्साह वाढविणारा आहे.
- संजय गुप्ता, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे

Web Title: sawantwadi kokan news rajbhasha award declare to kokan railway