सालईवाड्यात पंचायत समितीची इमारत

अमोल टेंबकर
बुधवार, 21 जून 2017

अनेक दिवसांच्या चर्चेला पूर्णविराम - आराखडा अंतिम टप्प्यात - सभापतींचा दुजोरा 

सावंतवाडी - येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शिरोडा नाका-सालईवाड्यातील जागेत पंचायत समितीची नवी इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला आराखडा मंजूरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

अनेक दिवसांच्या चर्चेला पूर्णविराम - आराखडा अंतिम टप्प्यात - सभापतींचा दुजोरा 

सावंतवाडी - येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शिरोडा नाका-सालईवाड्यातील जागेत पंचायत समितीची नवी इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला आराखडा मंजूरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

ही इमारत होईपर्यत त्याच ठिकाणी असलेल्या बांधकाम विभागाच्या गोडाऊनमध्ये सध्याचे कार्यालय नेण्यात येणार आहे. त्या गोडाऊनसमोर असलेल्या छोट्या कार्यालयात सभापती, उपसभापतींना केबिन देण्यात येणार आहे. याला पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी दुजोरा 
दिला आहे.

येथील पंचायत समितीची नवी इमारत कुठे उभारायची यावरून गेली सहा ते सात वर्षे चर्चा सुरू आहे; मात्र त्या काळात पदे भोगलेल्या तब्बल चार सभापतींना हा प्रश्‍न सोडविणे शक्‍य झाले नाही. 

विद्यमान सभापती मडगावकर यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत यांनीसुद्धा होकार दर्शविला आहे. याबाबतची माहीती श्री. मडगावकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे कार्यालय असलेली जागा ही जिल्हा परिषदच्या मालकीची आहे. त्या कार्यालयाच्या मागे जीर्ण झालेले रेस्ट हाऊस आहे. त्या ठिकाणी नवे कार्यालय उभारण्यात येणार आहे. 

त्या ठिकाणी शासनाची २९ गुंठे जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या टाईपप्लान प्रमाणे इमारत बसण्यास कोणतीही आडकाठी येणार नाही. पोलिस स्टेशन, तहसिलदार कार्यालय, वनविभाग, उपविभागीय पोलिस कार्यालय आदी सर्व कार्यालये या जागेपासून जवळ आहेत. 

रेल्वेस्टेशन आणि नवीन झाराप पत्रादेवी महामार्ग त्याच्यापासुन कमी अंतरावर आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार लक्षात घेता ही जागा योग्य असल्याचे आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने तसा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. याला पालकमंत्री दीपक केसरकर हे सुध्दा अनुकूल असतील.’’

या जागेच्या निर्णयावर मंत्रालय स्तरावरुन शिक्कामोर्तब झाल्यास रखडलेल्या कार्यालयाचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच पंचायत समितीला दोन कोटी रुपयाचे आलीशान असे हक्काचे कार्यालय मिळणार आहे.

भाड्यापोटीची रक्कम वाचविण्यात यश
सध्याची वापरात असलेली इमारत जिर्ण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरुन कार्यालय हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बांधकामच्या गोडावुनचा वापर करण्यात येणार आहे. ही जागा दोन हजार चौरस फुट आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे महीन्याकाठी बावीस हजार रुपये वाचणार आहेत. तत्पुर्वी खासगी जागेसाठी पस्तीस हजार रुपये भाडे मागण्यात आले होते.

जिल्हा परिषदची बांधकाम विभागाची जागा तत्कालीन माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावावर होती. साठ वर्षात कागदपत्रे नव्याने केली नव्हती. त्यामुळे समस्या होती; मात्र आता पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्‍यक ती कागदपत्रे तयार केली असून आता हक्काच्या जागेत आम्हाला जाता येणार आहे. आणि लवकरात लवकर हे काम पुर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत.
- रवी मडगावकर, सभापती, सावंतवाडी पंचायत समिती

Web Title: sawantwadi konkan news panchyat committee building