खासगी बससेवेला प्रवाशांची नापसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - चतुर्थी सणासाठी रेल्वे, बसेसने चाकरमान्यांनी गावाकडे येण्यास सुरवात केली आहे; मात्र खासगी बसेसकडे यंदा बऱ्याच चाकरमान्यांची गर्दी कमी दिसून आली. प्रवाशांनी मिळणाऱ्या सवलतींकडे धाव घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र एसटी महामंडळाकडून पाठविण्यात आलेल्या गाड्यांना प्रवासीवर्ग असल्याचे सांगण्यात आले.

सावंतवाडी - चतुर्थी सणासाठी रेल्वे, बसेसने चाकरमान्यांनी गावाकडे येण्यास सुरवात केली आहे; मात्र खासगी बसेसकडे यंदा बऱ्याच चाकरमान्यांची गर्दी कमी दिसून आली. प्रवाशांनी मिळणाऱ्या सवलतींकडे धाव घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र एसटी महामंडळाकडून पाठविण्यात आलेल्या गाड्यांना प्रवासीवर्ग असल्याचे सांगण्यात आले.

चतुर्थी सणाला अवघे तीन दिवस राहिले आहेत. पूर्वी चाकरमानी गावी येताना बऱ्याजदा खासगी बसेसने प्रवास करीत असत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असे. ऐरवी मुंबईकर रेल्वेचा प्रवाशाचा पर्याय पसंत नसल्यास खासगी आराम बसने प्रवास करीत असत. यंदा मात्र काही निराळीच परिस्थिती या खासगी बसेस मालकावर आली असल्याचे दिसून येत आहे. यंदा मुंबई ते सावंतवाडी असे ३५० ते ४५० रुपये तिकीटदर असूनही प्रवासीवर्ग या बसेसकडे नसल्याचे दिसून येत आहे. बसेस मधली जागा आरक्षित करण्याची वेळ येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. येथून बोरिवली येथे ४०० तर विरार येथे ५०० रुपये एवढे सरासरी तिकीट आहे.

चाकरमान्यांसाठी काहीकडून अवघ्या काही रुपयांतच सवलती उपलब्ध करून मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मिळणाऱ्या सवलतीच्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविल्यामुळे खासगी बसेसकडे पुरता प्रवासी उरला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याला एसटी महामंडळाची एसटी मात्र काही प्रमाणात अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. त्यात येथील आगार व्यवस्थापक अजय पाटील यांना विचारले असता त्यांनी एस टी महामंडळाच्या चाकरमान्यासाठी जादा गाड्यांना पुरेसा प्रवासी असल्याचे सांगितले आहे. त्यात येथील आगारातून जादा ३० गाड्या पाठविल्या असल्याचे सांगण्यात आले. यात सावंतवाडी निगडी, सावंतवाडी बोरीविली, चिंचवड दोडामार्ग, दोडामार्ग बोरीविली अशा ३० गाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या गाड्या पुणे व मुंबई या दोन प्रमुख ठिकाणाहून असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. शहरातून गाड्या पाठविण्यास अद्याप कोणतीही अडचण नसून गर्दीचा रोख पाहता गाड्या बाहेरून पाठव्याव्यात की शहरातून हे ठरविण्यात येवू शकते. सद्यस्थितीत बाजारपेठेत गर्दी असून कोणतीच अडचण नसल्याचे ते म्हणाले.

वैद्यकीय तपासणी पथके तैनात
जिल्ह्यातील बस व रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. यात एक आरोग्य कर्मचारी, एक आरोग्य सेविका व एक आरोग्य सेवक असे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतून एक पथक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. येथील तालुक्‍यात जवळपास ३० च्या आसपास आरोग्य कर्मचारी व सेवक सार्वजनिक प्रवासी ठिकाणी उपलब्ध झाले आहेत.

Web Title: sawantwadi konkan news Private bus service dislikes passengers