सावंतवाडी : नवे घर पुन्हा बजेटमध्ये

अचानक झालेली वाढ, दर आता मूळपदावर
house
housesakal

सावंतवाडी : बांधकाम क्षेत्रात महत्त्वाचा घटक असलेले सिमेंट आणि स्टीलचे गगनाला भिडलेले दर पुन्हा एकदा स्थिर झाल्याने घर बांधणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. वाढलेल्या दरामुळे थांबलेल्या बांधकामांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला होता. मुख्य म्हणजे बांधकाम क्षेत्रावर याचा थेट परिणाम दिसला होता. बांधकामासाठी सिमेंट आणि स्टील यावरच जास्त खर्च येतो आणि याच वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने विविध प्रकारची बांधकामे रडखली होती. घर हे सर्वसामान्यांचे एक स्वप्न असते. आपले घर इतरांप्रमाणे सुंदर, व्यवस्थित असावे, यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी कित्येक वर्षे पैशांची जुळवाजुळव केली जाते. मोठे परिश्रम घेतले जातात.

आताच्या बदललेल्या जमान्यात कौलारू घरे काहीशी मागे पडत आहेत. त्याजागी सिमेंट-काँक्रिटची स्लॅबची घरे उभी राहत आहेत. घरातील मातीच्या जमिनीची जागा आता टाईल्स फरशीने घेतली आहे, तर खिडक्या काचेच्या बसविल्या जात आहेत. एकूणच जिल्ह्यात राहणीमान बदलत चालले आहे. याच बदलेल्या परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना वाढलेली महागाई सर्वसामान्यांची स्वप्ने अधुरी ठेवते, हे अलीकडेच सिमेंट व स्टीलच्या वाढलेल्या दरांवरून दिसून आले.

बांधकाम साहित्याच्या दरावर अनेक घटक प्रभाव टाकतात. यात वाहतूक खर्च, हमाली आदी गोष्टींचा विचारही केला जातो. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम या दरांवर दिसून आला. भारतामध्ये निर्यात शुल्क कमी असल्याने भारतात तयार होणारा भाग जास्त प्रमाणात इतर देशात जातो. यावेळीही तसा गेला. याचा परिणाम येथील मालाच्या किंमतीवर झाला. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला. इंधनाचे दर वाढले. शिवाय स्टील आणि सिमेंटसाठी आवश्यक असणारा कच्चामाल याठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकला नाही. दुसरीकडे डिझेल, पेट्रोलचे दरही वाढले होते. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने निर्यात मंदावली होती. याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला होता. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीला ६३ रुपये किलो दराने मिळणारे स्टील जवळपास ९० रुपये किलोपर्यंत गेले होते.

सिमेंटच्या बाबतीतही हेच पाहायला मिळाले होते. साडेतीनशे रुपयांना मिळणारे सिमेंट चारशेपार गेले होते. वाढलेले दर परवडणारे नसल्याने हातात घेतलेले घराचे काम तसेच इतर बांधकामे अनेकांनी थांबविली होती. बांधकाम व्यावसायिकांनीही फ्लॅटच्या बांधकाम दरात वाढ होणार असल्याने कामे थांबविली होती. आता पुन्हा एकदा हेच वाढलेले दर खाली आले असून, सर्वसामान्यांना दिलासादायक आहेत. त्यामुळे थांबलेली बांधकामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. पावसाच्या तोंडावर कामे सुरू झाल्याने काम करताना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे; मात्र असे असले तरी आताचा दर सर्वसामान्यांसाठी परवडणारा असल्याचे बोलले जात आहे.

बांधकाम क्षेत्रातील आवश्यक वस्तूंच्या दरात थोडीशी वाढ अपेक्षित असते; मात्र या वर्षीच्या हंगामात सिमेंट आणि स्टील यांचे वाढलेले दर बांधकाम क्षेत्रावर परिणामकारक ठरले. वाढलेल्या दरानुसार माल खरेदी करून बांधकाम केले असते तर चौरस फुटामध्ये दोनशे ते तीनशे रुपये इतकी वाढ झाली असती. त्यामुळे बांधकाम थांबविण्याची वेळ आमच्यावर आली. सद्यस्थितीत दर पुन्हा एकदा स्थिर झाले असून, बांधकाम व्यावसायिकांसाठी समाधानकारक आहेत.’’

- डॉ. प्रा. दिनेश नागवेकर, बांधकाम व्यावसायिक, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com