नीतेश राणेंचे मच्छीमारांविषयीचे प्रेम पुतना मावशीचे - राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सावंतवाडी - आमदारकीत मोठी ताकद आहे, हे आमदार नीतेश राणेंना कळाले नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आमदारकीची ताकद नेमकी काय असते हे त्यांनी वडिलांकडून शिकून घ्यावे. राणेंना पारंपरिक मच्छीमारांविषयी निर्माण झालेले प्रेम पुतना मावशीचे आहे, अशी टीका खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी येथे केली.

सावंतवाडी - आमदारकीत मोठी ताकद आहे, हे आमदार नीतेश राणेंना कळाले नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आमदारकीची ताकद नेमकी काय असते हे त्यांनी वडिलांकडून शिकून घ्यावे. राणेंना पारंपरिक मच्छीमारांविषयी निर्माण झालेले प्रेम पुतना मावशीचे आहे, अशी टीका खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी येथे केली.

पर्णकुटी विश्रामगृहावर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शिवसेना नेहमी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने राहिली आहे. आयत्यावेळी राणे यांना त्यांच्याविषयी निर्माण झालेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. यापूर्वी त्यांनी कधी या प्रश्‍नावर वाचा फोडली नव्हती. आंदोलन करणे गैर नाही; परंतु एखाद्या अधिकाऱ्याच्या अंगावर मासे मारणे चुकीचे आहे. श्री. राणे साधे कार्यकर्ते असते तर आम्ही समजू शकतो; मात्र आता ते आमदार आहेत, याचा विसर त्यांना पडला असून एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे ते वागत आहेत. आमदार असलेल्या लोकप्रतिनिधीला वेगळे अधिकार दिलेले आहेत. असे असताना त्यांच्याकडून घडलेला प्रकार योग्य नाही. त्यांनी आमदारकी कशी असते, याबाबत आपल्या वडिलांकडून शिकून घ्यावे. त्यांना अधिकारांचे चांगले ज्ञान आहे.’’ 

श्री. राऊत पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात काही झाले तरी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर खापर फोडायचे आणि घडलेल्या प्रकाराला तेच जबाबदार आहेत, अशी ओरड करायची हे राणे कुटुंबीयांचे नेहमीचेच तुणतुणे झाले आहे; मात्र जिल्ह्यातील जनता नेमके आपल्या बाजूने कोण आहे आणि कोण दिखावूपणा करीत आहे हे जाणते. त्यामुळे आम्हाला काही वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही. पर्ससीननेट धारकांवर कारवाई व्हावी, या मताची शिवसेना पूर्वीपासून आहे. त्यानुसार शासनाकडून त्यांना मासेमारी करताना जागा ठरवून दिलेल्या आहेत. असे असताना त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्यांच्या होड्याही जप्त केल्या पाहिजेत.’’ यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारिणीत लवकरच फेरबदल
श्री. राऊत म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीत लवकरच फेरबदल होणार आहेत. काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. कार्यक्षम आहेत त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.’’

Web Title: sawantwadi news vinayak raut

टॅग्स