Uddhav Thackeray : आम्ही व्याजासह परतफेड करू

उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून शिवसेना संवाद यात्रेअंतर्गत त्यांनी आज मालवण, सावंतवाडी आणि कणकवली येथे जनतेशी संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal

सावंतवाडी, कणकवली - ‘राज्यातील मोदींची पिलावळ तपास संस्थांचा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत आहे. आम्हाला असे हुकूमशाही सरकार नको. जेव्हा आमचे दिवस येतील, तेव्हा व्याजासह परतफेड करू,’ असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देत भाजप आणि मित्रपक्षांचा समाचार घेतला. तसेच, आम्हाला सोडून गेलेले लोक गद्दारीचा टिळा आयुष्यभर पुसू शकणार नाहीत, असेही त्यांनी सुनावले.

उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून शिवसेना संवाद यात्रेअंतर्गत त्यांनी आज मालवण, सावंतवाडी आणि कणकवली येथे जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, ‘खरी शिवसेना कोणाची हे जनतेला माहिती आहे; परंतु आठवड्यातून एकदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या खुर्चीसाठी पक्षावरची श्रद्धा आणि सबुरी विसरतात.

अशा व्यक्तीवर लागलेला गद्दारीचा टिळा ते आयुष्यभर पुसू शकणार नाहीत.’ यावेळी ठाकरे यांचा रोख शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या दिशेने होता. ‘या राज्यातील मोदींची पिलावळ ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत आहे. त्यामुळे आम्हाला देशातील पाशवी बहुमताचे हुकूमशाही सरकार नको.

आम्हाला इंडिया आघाडीचे ‘मिलीजुली’ सरकार चालेल; मात्र जेव्हा आमचे दिवस येतील, तेव्हा व्याजासह परतफेड होईल,’ असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. ठाकरे म्हणाले, ‘मर्दपणा रक्‍तात असावा लागतो; पण भाजपमध्ये मर्दपणा नाही. त्‍यामुळे ‘ईडी’, ‘सीबीआय’ व इतर तपास यंत्रणा मागे लावून ते सर्व विरोधी पक्ष संपवायला निघाले आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर या तपास यंत्रणा बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा, आमचे शिवसैनिक तसेच राज्‍यातील, देशातील जनता तुम्हाला पायदळी तुडविल्‍याशिवाय राहणार नाही.’’

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक आणि इतर स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांना भरजरी वस्त्र व जिरेटोप परिधान करण्यात आला.

ठाकरे म्हणाले, ‘इथल्या एका डबल गद्दार माणसाला एका अपेक्षेने पक्षात घेतले होते. ते आठवड्यातून एकदा शिर्डीला जातात. म्हटले, देवाधर्माचा माणूस आहे; परंतु त्यांनी सत्तेसाठी केलेली गद्दारी आणि त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा टिळा ते आयुष्यात कधीच पुसू शकणार नाहीत.’

भगवा कायम सोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली अनेकदा महाराष्ट्रात येतात, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘नौदल दिन प्रथमच कोकणात झाला. पंतप्रधान कोकणाला भरभरून देऊन जातील, अशी अपेक्षा यावेळी होती; मात्र त्यांनी कोकणाला काहीच दिले नाही. परंतु, या ठिकाणी मंजूर असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. आम्ही मोदींचे शत्रू नाही. आम्ही त्यांच्यासोबत होतो. नंतर त्यांनीच आम्हाला दूर केले.

आम्ही आजही हिंदुत्व सोडलेले नाही आणि सोडणारही नाही. भगवा झेंडा कायम सोबत आहे; परंतु त्याला छेद देण्याचे काम भाजप करत आहे. कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन ‘होऊन जाऊ दे, चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेऊन हुकूमशाही सरकारच्या योजनांची पोलखोल करावी.’’

आता चुकल्यास हुकूमशाही निश्‍चित

‘भाजपमुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्‍यामुळे येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वा‍ची आहे. यावेळी तुम्‍ही चूक केली, तर देशामध्ये हुकूमशाही निश्‍चितपणे येईल. त्यामध्ये तुमच्यासह तुमच्या पुढील पिढ्यांना गुलामगिरी करण्याची वेळ येईल’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

तसेच,उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचे उदाहरण देत, ‘राज्‍यातील सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाले आहे; एक मिंधेंची गँग आणि एक भाजपची गँग असून या गँगवॉरमध्ये खरा भाजप पक्षच संपवला जात आहे,’ असेही ते म्‍हणाले.

ठाकरे म्‍हणाले, ‘भाजपला सत्तेत आणण्यासाठी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. पण भाजपच्या नेत्‍यांनी मूळ भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना, नेत्‍यांना बाजूला करून इतर पक्षातील गुंडांचा भाजपमध्ये भरणा केला. विरोधातील पक्ष फोडले जात आहेत. आता तर दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे; पण ज्‍यावेळी भाजपची सत्ता जाईल, त्यावेळी सर्व तपास यंत्रणा तुमच्याच पाठीशी लागतील याचेही भान मोदी, शहांनी ठेवावे.’

उद्धव ठाकरे म्हणाले,

  • भाजपकडून भगव्याला छेद

  • गद्दारांच्या नाकावर टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविणारच

  • जेव्हा संकटे आली, तेव्हा पंतप्रधान येथे फिरकले नाहीत

  • गद्दारांनी महाराष्ट्र लुटण्यासाठी सत्ता पाडण्याचे पाप केले

  • आम्ही ‘भाजपमुक्त जय श्रीराम’ अशी घोषणा करतो

  • भाजपचे हिंदुत्‍व घर पेटवणारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com