सात महिने झालं, करताय तरी काय ? कोकणातील दहा लाख विद्यार्थी विचारत आहेत प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

राज्यभरातून ५ वीतील सुमारे ५ लाख ७४ हजार तर आठवीतील ३ लाख ९७ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले.

दाभोळ : राज्यातील पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नसल्यामुळे सुमारे १० लाख विद्यार्थी या परीक्षेचा निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. या परीक्षेसाठी तयार केलेली उत्तरपत्रिका ‘ओएमआर’ पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाते. त्यामुळे फारसे मनुष्यबळ उत्तरपत्रिका तपासणीसाठी लागत नाही. तरीही सात महिन्यांचा कालावधी  (१६) रोजी पूर्ण झाला असूनही परीक्षेचा निकाल लागलेला नाही. 

हेही वाचा - बोगद्याचे काम पूर्ण ; कोकण रेल्वेची वाहतूक झाली सुरु 

राज्यात २२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाउन जाहीर केले होते. या लॉकडाउनमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्याचा फटका शिष्यवृत्ती निकालावर झाला; लॉकडाउन उठविल्याने आतातरी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागेल का, असा सवाल विचारला जात आहे. एकीकडे या परीक्षेनंतर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिरा का होईना, लागलेला असून, आता या शिष्यवृत्ती परीक्षेला सात महिने झाले तरी परीक्षेचा निकाल का लागत नाही, हा प्रश्‍न आहे.

राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागेल, असे सांगितले होते; राज्यभरातून ५ वीतील सुमारे ५ लाख ७४ हजार तर आठवीतील ३ लाख ९७ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी निकालासंदर्भात संवाद साधला असता, त्यांनी पाचवीच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या. आठवीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू असून लवकरच निकाल जाहीर होईल, असे सांगितले.

हेही वाचा -  रत्नागिरीत सावरकरांच्या संगीत नाटकाला नव्वद वर्षे झाली पूर्ण 

"माझा मुलगा आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसला होता; सात महिने होत आले तरी निकाल लागलेला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली असून हे मंडळ करतंय तरी काय? असा प्रश्‍न आम्हा पालकांना पडलाय." 

- हेमंत कळेकर, पालक, दापोली

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scholarship exam result pending in konkan section 10 lakh students wait a result in ratnagiri