शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण हमी कार्ड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कणकवली - कामानिमित्त दुसऱ्या गावाला स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची फरपट होते. यासाठी शिक्षण विभाग शाळाबाह्य मुलांना स्थलांतरित होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड देणार असून, त्याच्या आधारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे. या योजनेची कार्यवाही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानंतर करण्यात येणार असल्याची माहिती परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यभरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 6 ते 14 वर्षे वयोगटातील पाच हजार शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. त्यांना आता शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे स्थलांतरित विद्यार्थ्यांना परजिल्ह्यात अथवा परप्रांतात शिक्षण घेणे सहज शक्‍य होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांच्या मदतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. या वेळी शालेय शिक्षण विभागाला 2 लाख विद्यार्थी शाळाबाह्य आढळले होते. या शोध मोहिमेवर स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्वेक्षण माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले. यात जे विद्यार्थी आजपर्यंत शाळेत गेले नाहीत आणि जे विद्यार्थी 30 दिवसांपासून शाळेत गैरहजर आहेत, अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना स्थलांतरित होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे हा विद्यार्थी कुठल्या वर्गात आहे, कुठे शिक्षण घेत होता आदी शिक्षणासंबंधित माहिती मिळणार आहे. यासोबतच विद्यार्थ्याच्या पालकाने रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर केल्यास संबंधित ठिकाणी विद्यार्थ्याला सहज शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे.

Web Title: School students get education guarantee card