esakal | `या` वाडीत घुसला समुद्र !; तीन माड गिळंकृत
sakal

बोलून बातमी शोधा

Sea Encroachment In Mirya Patilwadi Ratnagiri Marathi News

मिऱ्या बंधाऱ्याच्या सुमारे साडेतीन किमीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची वाताहात सुरूच आहे. किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला असला तरी समुद्राच्या अजस्र लाटांमुळे बंधाऱ्याची धूप गेली काही वर्षे सुरूच आहे;

`या` वाडीत घुसला समुद्र !; तीन माड गिळंकृत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - समुद्राच्या रौद्र रूपाचा फटका मिऱ्या-पाटीलवाडी येथील रहिवाशांना बसला. पाटीलवाडी येथे बंधाराच वाहून गेल्याने समुद्राने रहिवाशांच्या जागेत घुसखोरी करून तीन ते चार माड गिळंकृत केले, तर लाटांच्या माऱ्याने अनेक ठिकाणांच्या भागाची मोठी धूप झाली आहे. बंधारा अनेक ठिकाणी वाहून गेल्याने किनारी भागातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

मिऱ्या बंधाऱ्याच्या सुमारे साडेतीन किमीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची वाताहात सुरूच आहे. किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला असला तरी समुद्राच्या अजस्र लाटांमुळे बंधाऱ्याची धूप गेली काही वर्षे सुरूच आहे; मात्र ती काही थांबता थांबलेली नाही. बंधाऱ्यामुळे अनेक भागांचे संरक्षण झाले असले तरी मिऱ्या-पाटीलवाडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

अन्य भागांत धूपप्रतिबंधक बंधारा आहे; मात्र पाटीलवाडी भागामध्ये काही मीटर बंधाराच शिल्लक राहिलेला नाही. बंधाऱ्याची दुरुस्ती केलेली नाही. बंधाराच नसल्याने समुद्राच्या अजस्र लाटांनी आज पाटीलवाडीत आक्रमण करून तेथील तीन ते चार माड गिळंकृत केले. किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, समुद्राच्या उधाणाचे पाणी थेट घरापर्यंत येत आहे. ते अडविण्यासाठी नागरिकांनी चिऱ्याचे किंवा दगडांचे बांध घातले आहेत. समुद्राच्या या अक्राळविक्राळ रूपाने पाटीलवाडीतील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे. 

मिऱ्यावासीयांचे अनोखे आंदोलन 
आजवर अनेक आंदोलने करूनही प्रशासनाने इकडे दुर्लक्ष केल्याने लक्ष वेधून घेण्यासाठी मिऱ्या ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. संदीप शिरधनकर या तरुणाने बंधाऱ्यावर जाऊन निषेध म्हणून स्वतःचे मुंडण करून घेतले, तर आज याच तरुणाने जय श्री राम लिहिलेला दगड बंधाऱ्यावर ठेवून भगवा झेंडा फडकवला. 

समुद्राच्या उधाणामुळे आता वित्तहानी झाली आहे. प्रशासन किंवा शासन आता जीवितहानीची वाट पाहत आहे की काय? समुद्राचे पाणी आमच्या घरापर्यंत आले आहे. जीव मुठीत घेऊन आम्हाला दिवस काढावे लागत आहेत. 
- योगेश पाटील, 
मिऱ्या-पाटीलवाडी ग्रामस्थ. 

loading image