कारभारीच प्रभारी ; संगीत खुर्चीच्या खेळाला आलाय बहर अन् डॉक्टर गेले रजेवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

सुविधांची कमतरता भासत आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचा प्रश्‍न काही सुटलेला नाही

रत्नागिरी : कोरोनाचे जिल्ह्यावर मोठे संकट असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सकपदी संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. रजेवर गेलेले शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हजर झाले; मात्र शल्य चिकित्सकाचा पदभार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे आहे. खुर्चीतील शल्य चिकित्सक फक्त नामधारी असून प्रभारींकडे सर्व कारभार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने बोल्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला नाही. संगीत खुर्चीच्या या खेळाला कंटाळून डॉ. बोल्डे पुन्हा रजेवर गेले आहेत. 

हेही वाचा - विद्यार्थीच नाहीत तर मग शाळेत येण्याची सक्ती का ? 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. बाधित रुग्णांनी आता पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. सुविधांची कमतरता भासत आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचा प्रश्‍न काही सुटलेला नाही. मनुष्यबळाची गंभीर समस्या आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनापुढे आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर जास्तीत जास्त रुग्णांच्या उपचारासाठी करण्याची गरज आहे; मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाच्या खुर्चीचा खेळ सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना यापूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा विषय चर्चिला जात होता; मात्र त्यांनी त्याचे खंडन करून आपण प्रकृती ठीक नसल्याने आजारी रजेवर जाणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा - रेंज नाही, इंटरनेट नाही, अभ्यास कसा करु ? अडीच हजार विद्यार्थ्यांना पडलाय हा प्रश्न 

दीर्घ आजारी रजेवरून ते दहा ते बारा दिवसांपूर्वी हजर झाले; मात्र त्यांच्याकडे कार्यभार दिला नाही. डॉ. फुले यांच्याकडे शल्य चिकित्सकपदाचा भार आहे. डॉ. बोल्डे हजर झाले. काही प्रशासकीय बाबींची पूर्तताही त्यांनी केली. मात्र, ते नामधारी ठरले. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार डॉ. फुले यांच्याकडे दिला आहे. त्यांची केबिन पहिल्या मजल्यावर आहे. या खेळाला कंटाळून डॉ. बोल्डे पुन्हा रजेवर गेले आहेत. बोल्डेंना होत असलेल्या विरोधाबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे आरोग्य संचालक विभागाकडून समजते. 

"माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुन्हा रजेवर आलो आहे. त्यामुळे शल्य चिकित्सक पदाबाबत काय चालले आहे, हे मला माहीत नाही."

- डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seat of surgiest in government not allowed by collector causes surgiest on holidya in ratnagiri