‘खवले मांजर वाचवा’ला रोजीरोटीची जोड

‘खवले मांजर वाचवा’ला रोजीरोटीची जोड

चिपळूण - येथील सह्याद्री निसर्ग मित्र व वन विभागतर्फे कोकणात खवले मांजर वाचवा प्रकल्प राबवला जात आहे. नवी दिल्ली येथील द हॅबिटाट ट्रस्टचे या प्रकल्पास पाठबळ मिळाले. खवले मांजर वाचवा प्रकल्पास रोजीरोटीची जोड देण्यात आली. 

जंगलामध्ये आढळणाऱ्या हरडा, बेहडा, मुरुड शेंगा, रिठा, वावडिंग, पळस फुले, शिकेकाई, चीरफळ, बिब्बा, शतावरी, गुळवेल आदी वस्तू शेतकरी, स्थानिक रहिवाशांनी जमवून ठेवाव्यात. संस्थेतर्फे त्याची विक्री केली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मुरुडशेंग, पळस, वावडिंग, चीरफळ आढळते. प्रत्येकाने आपापल्या परिसरात आढळणाऱ्या या वस्तू व्यवस्थित साठवून सुकवून ठेवाव्यात. सह्याद्री निसर्ग मित्र त्याच्या विक्रीची हमी घेईल. यात सहभागी होणाऱ्यांनी खवले मांजर संरक्षण संवर्धनात सहभागी व्हावे. त्यांनी केवळ खवलेमांजर संरक्षण जागृतीमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. १५ ते २० किलो वजनाचा हा प्राणी निशाचर असून फक्त मुंग्या डोंगळे व वाळवी खातो. जगात सर्वात जास्त शिकार व चोरटा व्यापार या प्राण्याचा होत असून त्याचे खवले चायनीज औषधांमध्ये वापरले जातात. दोन वर्षांपासून वन विभाग व पोलिसांच्या सहकार्याने संस्थेने खवले मांजर संरक्षण मोहीम सुरु केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनजागृती, ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्याने सर्वेक्षण, माहितगार लोकांच्या सहकार्याने अधिक माहिती व स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार, शाळांमध्ये कार्यक्रम आदी उपक्रमातून प्रकल्प सुरू आहे.  

विभागवार कलेक्‍शन सेंटरचा मानस

याचाच एक भाग म्हणून संस्थेने ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली. मोठ्या प्रमाणात या वस्तू उपलब्ध झाल्या, तर विभागवार कलेक्‍शन सेंटर उभी करण्याचा संस्थेचा मानस आहे. या सर्व वस्तू बाजार भावाप्रमाणे किंमत मिळवून देण्यात येईल. जंगल संपत्ती जमवून उप्तन्नात भर टाकावी, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्र व वन विभागातर्फे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com