विभागप्रमुख नांदोस्करांचा शिवसेनेतील पदांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मालवण ः पोईप मतदार संघाचे शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक नांदोसकर यांनी पक्षाचा, विभागप्रमुख पदाचा तसेच संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यत्वाचा राजीनामा आज आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठविला. पक्षातील गटातटाचे राजकारण, शिवसेना तालुकाप्रमुख यांचा मनमानीपणा, विकासात्मक कामांवर खासदारांनी केलेले दुर्लक्ष यासह अन्य कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे नांदोसकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

आमदार नाईक यांना सादर केलेल्या पत्रात नांदोसकर यांनी नमूद केले आहे की, मी गेली नऊ वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करत आहे. कठीण परिस्थितीत दहशतीला न जुमानता पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. यात पैशाची कधीही अपेक्षा केली नाही. पण राज्यात सत्ता आल्यावर नेत्यांची आमच्यावरील माया नाहीशी झाली. याला सर्वस्वी तालुकाप्रमुख बबन शिंदे जबाबदार आहेत. अनेकवेळा गावातील विकासकामांचे प्रस्ताव देऊनही त्यांनी ते गहाळ केले. तालुकाप्रमुखांबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना माफ करण्यात आले.

गावातील अनेक रस्त्यांची कामे सुचविण्यात आली होती. यात प्रत्येक वर्षात एका रस्त्याचे काम झाले असते तर खासदारांच्या तीन वर्षांच्या काळात तीन रस्त्यांची कामे मार्गी लागली असती. हे रस्ते तालुकाप्रमुखांनी केले असते तरी आम्हाला आनंद झाला असता. मात्र पक्षाने आपल्याला प्रत्येकवेळी एकाकी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तालुकाप्रमुखांनी विकासकामांची केवळ आश्‍वासने देत आपली फसवणूक केली आहे. तालुकाप्रमुख श्री. शिंदे हे आपल्या मिक्‍सरचे भाडे देणे आहेत. ते द्यावे लागेल म्हणूनच त्यांनी मला बाजूला केले आहे. नांदोस गावातील नळ तोडण्याची कारवाई केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार झाली. यात एकटा आपणच पोलिस ठाण्यात उपस्थित होतो. एकही पक्षाचा पदाधिकारी तेथे फिरकला नाही. याउलट अन्य पक्षांचे पदाधिकारी याठिकाणी आले होते. त्यामुळे जो पक्ष वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले तोच पक्ष आपल्या पाठीशी नसल्याचे दिसले. मला एकाकी टाकण्याचे तालुकाप्रमुख शिंदे यांचेच कारस्थान आहे. त्यामुळेच आपण पक्षासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे.

Web Title: sena leader resigns