#Tourism आंबोलीत नाईट सफारीचा ट्रेंड रूजला

अमोल टेंबकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत.

आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत.

एरव्ही धबधबा आणी थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारी आंबोली आता नाईट सफरसाठी प्रसिद्ध होत आहे. गावातील काही स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. यात अनोखे आणि दुर्मिळ प्राणी ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. प्रतिमहाबळेश्‍वर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आंबोलीचे अनेक पैलू येथे पाहावयास मिळतात.

कावळेसाद, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी अशा अनेक पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी देतात; मात्र स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन गेल्या काही वर्षांत ‘नाईट सफर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्या ठिकाणी रात्री काळ्या कुट्ट जंगलात फिरून दुर्मिळ वन्य जीव पाहण्याची संधी उपलब्ध केली आहे. 

यात मलबार पिट वायपर, ग्लायडिंग फ्राॅग, आंबोली टोड, डान्सिंग फ्रॉग, नॅरो माऊथ फ्राॅग, रिंकल फ्रॉग, कॅट स्नेक, ग्रीन वाईन स्नेक, क्रेट, आदी प्राण्यांचा समावेश असून, रात्री चमकणारे फंगस आकर्षणाचा विषय ठरत आहे. चाळीसपेक्षा अधिक जातीचे बेडूक, ३६ पेक्षा विषारी, बिनविषारी साप, पाली, विविध प्रकारची जीवजंतू आदींचा समावेश आहे.

हे दुर्मिळ वन्य जीव पाहण्यासाठी अनेक पर्यटक अभ्यासक, प्राणीमित्र गर्दी करत आहेत. त्यांना योग्य ती सेवा देण्यात येत असल्यामुळे तीसहून अधिक युवकांना रोजगाराचे दालन उभे राहिले आहे.

आंबोलीत आजपर्यंत काही ठरावीक पर्यटन स्थळे होती; मात्र स्थानिक युवकांच्या टीमकडून हे अनोखे पर्यटन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याला पर्यटकांनीही मोठी पसंती दिली असून, वन्य जीवांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- निर्णय राऊत, 

   संचालक, आंबोली टुरिझम

Web Title: Sharvan Tourism specail story on Amboli