शेर्लेवासीयांची पुलाची प्रतीक्षा संपणार तरी केव्हा?

नीलेश मोरजकर
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

बांदा - गेली ३८ वर्षे कित्येक आंदोलने, उपोषणे करूनही बांदा - शेर्ले तेरेखोल नदीपात्रावरील फुटब्रिजला शासनस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने नदीपल्याड जाण्यासाठी शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना होडीचाच आधार घ्यावा लागत आहे. दरदिवशी शेकडो ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी धोका स्वीकारून होडीतून प्रवास करतात. त्यामुळे शेर्लेवासीयांच्या दळणवळणासाठीचा मुख्य आधार असणाऱ्या या पुलाची प्रतीक्षा संपणार तरी केव्हा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बांदा - गेली ३८ वर्षे कित्येक आंदोलने, उपोषणे करूनही बांदा - शेर्ले तेरेखोल नदीपात्रावरील फुटब्रिजला शासनस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने नदीपल्याड जाण्यासाठी शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना होडीचाच आधार घ्यावा लागत आहे. दरदिवशी शेकडो ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी धोका स्वीकारून होडीतून प्रवास करतात. त्यामुळे शेर्लेवासीयांच्या दळणवळणासाठीचा मुख्य आधार असणाऱ्या या पुलाची प्रतीक्षा संपणार तरी केव्हा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बांदा - शेर्ले नदीपात्रावर १९७८ पासूनची फुटब्रिजची मागणी ही आश्‍वासनांच्या गर्तेत सापडली आहे. जून १९८३ ला सोमवारी आठवडा बाजारादिवशी या नदीपात्रात होडी उलटून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सात जणांना जलसमाधी मिळाली होती. या घटनेनंतर फुटब्रिजच्या मागणीचा जोर वाढला होता.

शेर्लेसह मडुरा, निगुडे, कास, पाडलोस, आरोस, रोणापाल ही गावे बांदा बाजारपेठेवर अवलंबून आहेत. या गावातील ग्रामस्थ शेर्ले येथून बांदा येथे येण्यासाठी तेरेखोल नदीपात्रात होडीचा आधार घेतात. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहताना हा प्रवास धोकादायक ठरतो. शेर्ले दशक्रोशीतील ४०० हून अधिक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोज याच नदीपात्रातून प्रवास करून बांदा शहरात यावे लागते.

शेर्ले गावचे पंधरा वर्षे सरपंच असलेले युसूफखान बिजली यांनी देखील पुलासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र प्रत्येकवेळी ग्रामस्थांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. बांदा-शेर्ले दरम्यानचे नदीपात्र हे १२० फूट लांबीचे आहे.

शेर्ले परिसरातील शाळकरी विद्यार्थी, बाजारहाट, रुग्णसेवा बांदा शहरावर अवलंबून असल्याने वर्षाचे बाराही महिने येथील ग्रामस्थांना होडीतून प्रवास करावा लागतो. गेली चार वर्षे ग्रामस्थ श्रमदानाने साकव उभारतात; मात्र पावसाळ्यात ग्रामस्थांना बांद्यात येण्यासाठी आजही होडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या नदीपात्रातून होणारी धोकादायक वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी आहे.

बांदा-शेर्ले नदीपात्रावरील पुलाचे काम येत्या दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे. जीवन प्राधिकरणाच्या सासोली ते वेंगुर्ले या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असून ही लाईन बांदा-शेर्ले नदीपात्रातून जात आहे. पावसाळ्यानंतर कामास प्रारंभ होणार असल्याने शेर्ले ग्रामस्थांची होडी प्रवासातून सुटका होणार आहे.
- मंदार कल्याणकर,
सरपंच, बांदा

गेली ३८ वर्षे या नदीपात्रावर पुलाची मागणी होत आहे. शेर्ले पंचक्रोशीतून बांदा येथे जाण्यासाठी रहदारीचा प्रमुख मार्ग असल्याने या नदीपात्रातील होडीतून दिवसागणिक शेकडो ग्रामस्थ प्रवास करतात; मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुलाचे काम अद्यापपर्यंत रखडले आहे.
- उदय धुरी,
सरपंच, शेर्ले

आतापर्यंतच्या दुर्घटना

  •   जून १९८३ मध्ये होडी उलटून ७ जणांचा बुडून मृत्यू.
  •   १९८९ मध्ये ओटवणे येथील महिला नदीपात्रात बुडाली.
  •   १९९९ मध्ये शेर्ले येथील युवतीचा नदीपात्रात बुडून मृत्यू.
  •   पंधरा वर्षांपूर्वी बांद्यातील युवक बुडाला.
  •   आठ वर्षांपूर्वी तेरेखोल तुळसाण पुलाखाली दोघा तरुणांचा बुडून मृत्यू.
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sherle bride issue special story