असनिये शिमगोत्सवाची जल्लोषात सांगता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

असनिये - संस्कृती जपणारे गाव अशी ओळख असलेल्या असनियेच्या शिमगोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. वर्षभर गावात असलेली दारूबंदी या उत्सवात आजच्या शिमगोत्सवाच्या सांगतेवेळी काही तासांसाठी उठते. या वेळी काढलेले रोंबाट लक्षवेधी ठरले. 

असनिये - संस्कृती जपणारे गाव अशी ओळख असलेल्या असनियेच्या शिमगोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. वर्षभर गावात असलेली दारूबंदी या उत्सवात आजच्या शिमगोत्सवाच्या सांगतेवेळी काही तासांसाठी उठते. या वेळी काढलेले रोंबाट लक्षवेधी ठरले. 

आपल्या आगळ्या सांस्कृतिक परंपरेमुळे असनियेची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. मध्यंतरी मायनिंग प्रकल्पाला केलेल्या कडव्या विरोधामुळे हे निसर्गरम्य गाव राज्यस्तरावर चर्चेला आले. इथले समृद्ध पर्यावरण, त्याला जपण्यासाठी प्राणपणाने लढण्याला पण मुळात इथली संस्कृतीच पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन करणारी आहे. या सगळ्यामध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या नऊ दिवसांच्या शिमगोत्सवाचे महत्त्वाचे स्थान आहे. 

या गावात वर्षभर दारूबंदी पाळली जाते. पिढ्यान्‌पिढ्या ही परंपरा सुरू आहे. ही दारूबंदी शिमगोत्सवात शेवटच्या दिवशी रोंबाटादिवशी काही तासांसाठी उठते. हा शिमगोत्सव सांगतेचा सोहळा आज झाला. याला हजारो भाविकांनी हजेरी लावली. 

गेले आठ दिवस या उत्सवानिमित्त विविध प्रथा-परंपरा पाळल्या गेल्या. आज नवव्या दिवशी सकाळी अवसारी कौलानंतर हळदणी (तीर्थ) देण्यात आले. यानंतर काही तासांपुरती दारूबंदी उठली. यानंतर खेळे फिरविण्यात आले. रंगांची उधळण करीत नाचत रोंबाट सुरू झाले. तरुणाई यात बेधुंद होऊन नाचत होती. 

सायंकाळी मंदिराजवळील होळीजवळ मुख्य सोहळा झाला. या वेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रोंबाट होळीजवळ आल्यानंतर नारळ तोडणीचा कार्यक्रम झाला. यानंतर गावात चोर सोडून धुळवडीचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरा इतर धार्मिक कार्यक्रमही सुरू होते. माहेरवाशिणीचा देव अशी ओळख असलेल्या वाघदेवाच्या दर्शनासाठीही गर्दी होती. ओटी भरण्यासाठीही गर्दी केली होती. 

इकाच्या वाटीतील तीर्थासाठी गर्दी 
असनियेच्या शिमगोत्सवाचे इकाच्या वाटीतील वर्षातून एकदाच मिळणारे तीर्थ हे एक वैशिष्ट्य. गावचा मानकरी भगव्या वेशात या वैशिष्ट्यपूर्ण वाटीतील तीर्थ देत होता. यात दुर्धर आजार बरे करण्याचे सामर्थ्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या वेळी या तीर्थासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटकातील भाविकांचीही गर्दी होती. 

Web Title: shimga in asniye