ढालकाठीमुळे वैशिष्ट्यपूर्ण बनलेला शेवरेतील शिमगोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मंडणगड - वरदान देवीची ढालकाठी केंद्रबिंदू मानून तालुक्‍यातील शेवरे गावातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. देवी आरूढ झालेली ढालकाठी अगदी पालखीप्रमाणे गावोगावी फिरण्यासाठी निघाली आहे. या ढालकाठीमुळे शेवरे गावचा शिमगोत्सव आगळावेगळा ठरतो. 

मंडणगड - वरदान देवीची ढालकाठी केंद्रबिंदू मानून तालुक्‍यातील शेवरे गावातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. देवी आरूढ झालेली ढालकाठी अगदी पालखीप्रमाणे गावोगावी फिरण्यासाठी निघाली आहे. या ढालकाठीमुळे शेवरे गावचा शिमगोत्सव आगळावेगळा ठरतो. 

गावात पुरातन देवस्थानांमध्ये वरदान, मानाई, झोलाई वाघजाई, भैरी, चनकाई यांची स्थाने आहेत. फाल्गुन महिन्यातील फाक पंचमीची पहिली होळी झाल्यानंतर दुसऱ्या होळीच्या दिवशी पन्नास फूट लांब अर्धाफूट व्यासाची बाबूंची काठी आणण्यात आली. या काठीस ढालकाठी म्हटले जाते. ढालकाठी सुंदर रंगीबिरंगी कापड्यांनी सजवण्यात आली. काठीच्या शेवटच्या टोकावर चांदीचा कळस व गावदेवाचा भगवा ध्वज लावण्यात आला. यानंतर परंपरेप्रमाणे वरदान देवीच्या प्रांगणात काठी उभी करून गावातील पुरुष मंडळीसह पुजाऱ्यांनी देवीचे पूजन करून साकडे घातले.

देवीसमोरील एक फूल आणून ढालकाठीची पूजा करण्यात आली. पूजेनंतर वरदानी देवी ढालकाठीवर आरूढ होते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ढालकाठी परिसरातील ८४ वाड्या फिरण्यासाठी रवाना झाली. ही प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. या ढालकाठीचे वाड्यांमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या काठीला नवसाची प्रथाही आहे.

लहान मुलांच्या शरीरावर काही बाधा येऊ नये यासाठी काठीसमोर मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातल्यास मुलास त्रास होत नाही, अशी श्रद्धा आहे.  
काठी शिमगोत्सवात सात दिवस फिरवण्याची प्रथा असून श्रीवर्धन (रायगड) तालुक्‍यातील हरिहरेश्वर येथेही देवीला भेटीसाठी नेले जाते. यावर्षी मात्र ही ढालकाठी हरिहरेश्‍वरला नेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मंडणगड शहरात या ढालकाठीचे आज सायंकाळी जोरदार स्वागत करण्यात आले. शुक्रवारी (ता. १०) आठव्या होळीला देवी रात्री वाजतगाजत शेवरे गावात आगमन होणार आहे. त्यामुळे गावातील रस्ते सारवून रांगोळीने सजवले जाणार आहेत. यानिमित्ताने गावात जत्रा भरणार आहे. १२ मार्चला रात्री येथील शिमगोत्सव होणार आहे. त्यानंतर धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी (ता. १४) ढालकाठी वाजतगाजत देवीच्या देवळासमोर नेण्यात येणार आहे.

येथे पुजारी काठीची पूजा करून काठीसमोरील फुल देवीसमोर ठेवतील. त्यामुळे सात दिवस भ्रमंती करणारी देवी पुन्हा एकदा आपल्या जागी आरूढ होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Web Title: shimgotsav in shevare village

टॅग्स