शिवसेना जिल्हाप्रमुखासह १४ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

देवरूख - निवडणूक प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या गैरसमजाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुमारे १४ जणांनी भाजपचे कसबा गटाचे उमेदवार राकेश जाधव यांच्या घरी काल (ता. २०) रात्री १२.३० च्या दरम्यान शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार राकेश जाधव यांनीच संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या १४ जणांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचा समावेश आहे.

देवरूख - निवडणूक प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या गैरसमजाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुमारे १४ जणांनी भाजपचे कसबा गटाचे उमेदवार राकेश जाधव यांच्या घरी काल (ता. २०) रात्री १२.३० च्या दरम्यान शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार राकेश जाधव यांनीच संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या १४ जणांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचा समावेश आहे.

जिल्हाप्रमुखच या प्रकारात असल्याची तक्रार झाल्याने या घटनेकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. याबाबत संगमेश्‍वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे जिल्हा चिटणीस राकेश जाधव हे कसबा जिल्हा परिषद गटातून भाजप तर्फे निवडणूक लढवत आहेत. राकेश जाधव हे पूर्वीचे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते होते. 

वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वतःच्या उमेदवारीमुळे ते गेले दहा दिवस कसबा गटात प्रचारात सक्रिय आहेत. याच  प्रचारादरम्यान झालेल्या गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

जाधव यांनी संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह घरीच होते. याचवेळी अज्ञात वाहनातून आलेल्या सुमारे १४ जणांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर लाथाबुक्‍क्‍यांनी मारण्यास सुरवात केली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे जाधव यांनी दरवाजा उघडून त्यांना जाब विचारला असता उपस्थित सर्वांनीच जाधव यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली, शिवाय त्यांच्या बोलेरो या गाडीचे नुकसानही केले. यानंतर हे सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले. झाल्या प्रकाराची माहिती जाधव यांनी वरिष्ठांना दिली. तसेच तातडीने संगमेश्‍वर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. 

दाखल तक्रारीनुसार राकेश जाधव यांच्या घराबाहेर गैरकायदा जमाव करून संगनमताने गैरकृत्य करीत, गाड्यांचे काही प्रमाणात नुकसान केले व आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, त्यांचे कार्यकर्ते पर्शराम पवार, अलंकार महाजन व अज्ञात १० जणांवर संगमेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे कसबा गटात पुन्हा खळबळ उडाली आहे.  येथील लढत हाय व्होल्टेज असल्याने या गटाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Shiv Sena district chief on charges against