esakal | शिवसेनेची व्होट बॅंक फोडण्याचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

शिवसेनेची व्होट बॅंक फोडण्याचे आव्हान

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण: मुंबईतील कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. मुंबई जिंकायची असेल तर कोकणातील चाकरमानी भाजपकडे वळणे फार गरजेचे आहे. नारायण राणे हे मुंबईतील कोकणी माणसाला भाजपकडे वळवू शकतात, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे शिवसेनेची व्होट बॅंक फोडण्यात राणे किती यशस्वी होतात, हे महापालिका निवडणुकीत दिसेल.

नारायण राणे हे अभ्यासू, आक्रमक आणि संघटनात कुशल नेते आहेत, याबाबत कुणाचेही दुमत नाही. शिवसेना सोडल्यानंतरही काही वर्षे राणेंचा राजकीय प्रभाव टिकून होता. त्या जोरावर त्यांनी काँग्रेसमध्ये मंत्रिपद मिळवले; मात्र, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारता आली नाही. उलट उत्तरोत्तर त्यांचा प्रभाव कमी होत गेल्याचे दिसते. सिंधुदुर्गात त्यांना पराभव पत्करावा लागला.

मुंबईत वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. राणेंचे पुत्र नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांचे वजन वाढल्याचे बोलले जात असतानाच त्यांना अटकही करण्यात आली. हे सगळे बघता नारायण राणे यांचा मुंबईतील मतदारांवर कितपत प्रभाव पडेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

ती उणीव राणे भरून काढतील

मागील निवडणुकीत भाजपने शिवसेनेला ''काँटे की टक्कर'' दिली होती. तरीही भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. मुंबईत भाजप शिवसेनेपेक्षा एक पाऊल मागेच राहिला. विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. भाजपने सर्व पर्याय वापरले तरी महापालिका जिंकणे शक्य झाले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपला एका आक्रमक नेतृत्वाची गरज होती. ती उणीव राणे भरून काढतील, असे भाजपला वाटत आहे.

राज ठाकरेंशी उत्तम संबंध

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका निवडणूक निकालावर परिणाम करणारी ठरणार आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. ही युती झाली नाही तरी भाजप व मनसे या दोन्ही पक्षांचे लक्ष्य शिवसेना हेच असणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष परस्परांवर टीका न करता निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर राग असला तरी राज ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. हे संबंध महापालिका निवडणुकीत छुप्या राजकीय सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा वेळी राणे हे भाजपसाठी उपयुक्त ठरू शकतात.

मुंबईत भाजपचे स्टार प्रचारक

भाजपने अधिकृतपणे कुठलीही घोषणा केली नसली तरी राणे हे मुंबईत भाजपचे स्टार प्रचारक असणार, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपकडे राज्यपातळीवर अनेक नेते आहेत; मात्र मुंबईतील मतदारांना आणि चाकरमान्यांना आकर्षित करेल, असा एकही नेता नाही. जे आहेत, ते राणेंइतके सक्षम नाहीत. त्यामुळे भाजपने नाराय़ण अस्त्र निवडले आहे.

शिवसेनेत असताना राणेंचे कार्यक्षेत्र मुंबई होते. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे महापालिकेतील आणि मुंबईतील राजकारणाच्या सगळ्या खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. ते शिवसेनेच्या कारभाराला नेमकेपणाने लक्ष्य करू शकतात. मुंबई महापालिका निवडणुकीत राणेंची भाजपला नक्की मदत होईल.

- डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष भाजप

loading image
go to top