सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिरात शिवजयंती साजरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी यापूर्वी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड किल्ल्याप्रमाणेच सिंधुदुर्गला महत्त्व असल्याने या किल्ल्याच्या विकासासाठी आवश्यक निधीही येत्या काळात उपलब्ध करून दिला जाईल.

- दीपक केसरकर

मालवण - ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्‍वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत जास्तीत जास्त निधी येत्या दोन दिवसात उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली. 

शिवजयंतीनिमित्त आज सकाळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली.

त्यांच्या उपस्थितीत शिवराजेश्‍वर मंदिरात विधिवत पूजा पार पडली. यावेळी शिवराजेश्‍वर मंदिरचे पुजारी श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. केसरकर म्हणाले, किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी यापूर्वी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड किल्ल्याप्रमाणेच सिंधुदुर्गला महत्त्व असल्याने या किल्ल्याच्या विकासासाठी आवश्यक निधीही येत्या काळात उपलब्ध करून दिला जाईल. किल्ल्याची तटबंदी धोकादायक बनल्याने पर्यटक व शिवप्रेमींची होणारी गैरसोय लक्षात घेता तटबंदी नूतनीकरणाचा प्रस्ताव तत्काळ द्यावा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. या किल्ल्याच्या विकासासाठी आमदार वैभव नाईक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासारखा आमदार लाभणे हे मालवणवासियांचे भाग्य आहे अशा शब्दांत आमदार नाईक यांचा श्री. केसरकर यांनी गौरव केला. 

स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या माध्यमातून 50 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल. किल्ल्यास भेट देण्यास येणारा पर्यटक येथे थांबायला हवा यासाठी स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न करावेत. किल्लावासियांना पाण्याची समस्या भासत असून ती दूर करण्यासाठी पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेतली जाईल.

किल्ला प्रवासी होडी वाहतुकीच्या होड्या अद्ययावत करण्यासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत 75 टक्के अनुदान दिले जाईल असे आश्‍वासनही श्री. केसरकर यांनी यावेळी दिले. यानंतर तटबंदीवरील शासकीय शिवजयंतीचे ध्वजारोहण श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayant on Sindhudurg fort