राजापुरात सेनेच्या सोमवारी मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

राजापूर - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्‍चितीसह मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी (ता. १६) मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

राजापूर - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्‍चितीसह मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी (ता. १६) मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. तालुक्‍यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक होणार आहे. तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील राजकारणावर पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या तुलनेमध्ये शिवसेनेचे अधिक वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे उमेदवार निश्‍चित करताना पक्षांतर्गत नाराजी, धुसफूस तसेच पक्षांतर्गत दगाफटका याचा संभव आहे. हे ध्यानी घेऊन शिवसेना नेतृत्वाने आतापासूनच उमेदवारी निश्‍चित करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. संभाव्य उमेदवार नेमका कसा असावा यासंबंधी संघटनेतील शेवटचे टोक असलेल्या शाखाप्रमुखांचीही मतेही शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाने जाणून घेतली आहेत. त्यानंतर आता थेट इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. तालुक्‍यातील इच्छुकांच्या सोमवारी होणाऱ्या मुलाखतीवेळी खासदार विनायक राऊत,जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली. यावेळी इच्छुक उमेदवारांना वरिष्ठांकडून कोणकोणते प्रश्‍न विचारले जाणार, त्यातून कोणाची उमेदवारी अंतिम होणार आणि कोणाचे पत्ते कापले जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shivsena interviews on Monday Rajapur