एलईडी मासेमारीविरोधात अधिवेशनात शिवसेनेचे आंदोलन

एलईडी मासेमारीविरोधात अधिवेशनात शिवसेनेचे आंदोलन

मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाइटद्वारे केल्या जाणाऱ्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागास शासनाची गस्तीनौका मिळावी, अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी शासनाने कडक कायदा अमलात आणावा, यासाठी शिवसेना आमदारांनी अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. 

या आंदोलनात आमदार वैभव नाईक, आमदार अशोक पाटील, आमदार रमेश लटके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुभाष भोईर आदी सहभागी झाले होते. यावेळी एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे, पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसेना आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले.

कोकण किनारपट्टीवर गेल्या काही महिन्यांमध्ये एलईडी मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या बोटींमधून २५ ते ३० एलईडी लाईटच्या प्रखर प्रकाशाच्या साहाय्याने मासळीची लूट केली जात आहे. कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात या ठिकाणच्या मोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मासळीची लूट होते.

यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. ही मच्छीमारी अशीच सुरू राहिल्यास भविष्यात समुद्री मासे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली असून पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. परिणामी मच्छीमार उद्‌ध्वस्त होणार आहेत. यामुळे ही एलईडी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, अशी आमची भूमिका असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com