नारायण राणेंचाच फॉर्म्युला वापरतेय शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - निवडणुका जिंकण्याचा नारायण राणेंचाच फंडा वापरून सध्या शिवसेना राणेंच्याच स्वाभिमान पक्षाला घायाळ करत आहे. गावोगाव कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणत वातावरणनिर्मितीवर शिवसेनेने भर दिला आहे. दुसरीकडे राणेंची पुढील राजकीय दिशा अद्याप स्पष्ट झाली नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात संभ्रम आहे.

सावंतवाडी - निवडणुका जिंकण्याचा नारायण राणेंचाच फंडा वापरून सध्या शिवसेना राणेंच्याच स्वाभिमान पक्षाला घायाळ करत आहे. गावोगाव कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणत वातावरणनिर्मितीवर शिवसेनेने भर दिला आहे. दुसरीकडे राणेंची पुढील राजकीय दिशा अद्याप स्पष्ट झाली नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात संभ्रम आहे.

१९९० पासून सिंधुदुर्गात नारायण राणेंचे राजकीय पर्व सुरू झाले. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत राणेंसाठी फारशी स्पर्धा नव्हती. याचे श्रेय राणेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गवसलेल्या निवडणूक फंड्याला बऱ्यापैकी द्यावे लागले.

बहुसंख्य सत्तास्थाने आपल्या हातात ठेवायची व निवडणुका आल्या की, विरोधी पक्षातील कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांचे आपल्याकडे पक्षप्रवेश घडवून आणायचे असे याचे सूत्र होते. पक्षप्रवेशामुळे विरोधी पक्ष निवडणूक मोर्चेबांधणीला कमी पडायचा.  शिवाय राणेंच्या बाजूने लोकांमध्ये वातावरणनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे. राणेंचा पक्षप्रवेशाद्वारे वातावरणनिर्मितीचा फंडा त्यांनी जोरकसपणे वापरायला सुरवात केली आहे. 

मालवणात राणे समर्थक दोघांसह चार नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाने हे अधिक प्रकर्षाने जाणवले. त्या आधी आणि नंतर गावोगावी स्वाभिमान, काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. काही प्रवेश थेट मातोश्रीवर घडवून आणले जात आहे. आणखी अनेकजण ‘क्‍यू’ मध्ये असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. या फॉर्म्युल्याने स्वाभिमान पक्ष चांगलाच घायाळ झाला आहे.

...याच परिस्थितीचा फायदा घेतेय शिवसेना
२०१४ ला राणेंच्या झालेल्या पराभवानंतर हळूहळू सिंधुदुर्गातील राजकारण बदलत गेले. राणेंचे राजकीय वलय कमी होऊ लागले. आता राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत; मात्र भाजपने त्यांचा पक्षप्रवेश अद्याप निश्‍चित केलेला नाही. यामुळे त्यांचे जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. याच परिस्थितीचा फायदा शिवसेना घेत आहे.

मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्‍यता
सिंधुुदुर्गात निवडणुकीच्या तोंडावर आणखी काही मोठे पक्षप्रवेश घडण्याची शक्‍यता आहे. राणेंचे पुढचे राजकीय पाऊल काय असेल, यावर हे पक्षप्रवेश निश्‍चित होणार आहेत. यातील काहीजण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. काहीजण नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या तयारीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena using Narayan Rane Formula in SIndhudurg