शोभायात्रेने नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

रत्नागिरी - चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा, मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरामध्ये ग्रामदैवत श्री भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिरापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. सुमारे सात ते आठ हजारांहून अधिक लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. यंदा प्रथमच मारुती मंदिर परिसरातील शोभायात्रा जयस्तंभ येथे मुख्य शोभायात्रेत सहभागी झाली. त्यामुळे शोभायात्रा आणखी भव्य-दिव्य झाली.

श्री भैरी जोगेश्‍वरी, तृणबिंदुकेश्‍वर, नवलाई पावणाई मंदिर ट्रस्ट व पतितपावन मंदिर ट्रस्टच्या संयुक्‍त विद्यमाने या स्वागतयात्रेचे आयोजन केले. सकाळी ९ वाजता ग्रामदैवत भैरीबुवा मंदिरात गुढी उभी करून ध्वजपूजन करून शोभायात्रेस सुरवात झाली. ग्राम मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेवर आधारित या शोभायात्रेत हजारो हिंदू बंधू-भगिनी सहभागी झाल्या. खालची आळी, टिळक आळी नाका, गोखले नाका, मारुतीची आळी, जयस्तंभमार्गे रामआळीमार्गे गोखले नाका, स्वा. सावरकर चौक व पतितपावन मंदिर या मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. प्रत्येक नाक्‍यावर रत्नागिरीकरांनी आकर्षक रांगोळ्या, पताका, कमानी उभारून यात्रेचे स्वागत केले.

पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह सामाजिक ऐक्‍याचे संदेश देणारे ६० हून अधिक चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. फटाके न वाजवता आणि गुलालाची उधळण न करता शिस्त पाळण्यात आली. कर्णकर्कश ध्वनीही टाळण्यात आला. शांत, मंद स्वरांत भक्‍तिगीते, अभंग आणि खड्या आवाजात पोवाड्यांचे गायन सुरू होते. याशिवाय पारंपरिक ढोल, ताशे, तुतारीचा निनाद गर्जला.

शिवरुद्रा ढोल-ताशे पथकाने शोभायात्रेत साऱ्यांचे लक्ष वेधले. सुमारे ३ तास चाललेल्या या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. देवता पूजन दर्शन, ध्वजारोहण व ध्वजपूजनाने यात्रेला प्रारंभ होतो व हिंदू धर्माच्या प्रतिज्ञेने, देवतांच्या पूजनाने, गूळ, जिरे, कडुनिंब यांच्या प्रसाद सेवनाने या यात्रेची सांगता झाली. तसेच प्रथेप्रमाणे श्री भैरी मंदिरात सायंकाळी पंचांग पूजन व पंचांग वाचन करण्यात आले.

Web Title: shobhyatra in ratnagiri