धक्कादायक ! 80 टक्के कोरोना योद्धेच गुहागर तालुक्यात विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shocking  Eighty Percent Corona Warriors In Guhagar Taluka Corona Positive

गुहागर तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 वर पोहचली आहे. यामध्ये चारजणांचा मुत्यू झाला आहे. 130 जण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु अजून 85 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक ! 80 टक्के कोरोना योद्धेच गुहागर तालुक्यात विळख्यात

गुहागर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवताना प्राथमिक आरोग्य यंत्रणाही कोरोनाच्या विळख्यात आली आहे. गेले पाच महिने यावर नियंत्रण करणाऱ्यांपैकी 80 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे आता याची जबाबदारी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्याने नियोजन करण्याची गरज आहे. 

गुहागर तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 वर पोहचली आहे. यामध्ये चारजणांचा मुत्यू झाला आहे. 130 जण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु अजून 85 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वेळणेश्वर कोविड सेंटरमध्ये 26, घरामध्येच आयसोलेट केलेले 49, रत्नागिरी येथे 5 जण उपचार घेत आहेत. पुणे येथे 2 तर कराड व चिपळूण - कामथे येथे प्रत्येकी एकजण उपचार घेत आहे. यामध्ये पूर्वीची कोरोना प्रादुर्भावाची तपासणी व पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यानंतर तेथील भागात सर्व्हे करणारे स्टाफ कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 

सध्या गुहागर तालुका आरोग्य कार्यालय निर्जंतुक केले आहे. कार्यालयात केवळ दोघांचाच स्टाफ राहिला आहे. यामुळे आता कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड यांच्याकडे कोरोना रुग्ण सापडल्यानंतरची सर्व जबाबदारी सोपवली आहे. ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कराड येथे उपचार सुरू आहेत. वैद्यकीय विभागातील प्रमुखावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दररोजची रुग्णांची माहिती संकलन करून अहवाल देणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. केवळ त्या टीममधील दोघेजण निगेटिव्ह आहेत. याचवेळी तालुका कार्यालयातील संगणक बंद पडले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. 

सर्व्हे करण्यासाठी हवे मनुष्यबळ 
डॉ. जांगीड यांनी यापूर्वी तालुका आरोग्य अधिकारीपद सांभाळले होते. परंतु त्यांना त्यांच्यासोबत रुग्णांच्या परिसरातील सर्व्हे करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. यापूर्वी तालुक्‍यात एखादं दुसरा रुग्ण होता त्या वेळी आरोग्य यंत्रणेची मोठी टीम कार्यरत होती, परंतु त्या टीमपैकी बहुतांश जणांना कोरोना प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे गुहागर तालुक्‍यातील आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.