दुर्गवीर प्रतिष्ठानची मृगगडावर श्रमदान मोहीम

अमित गवळे
रविवार, 15 एप्रिल 2018

सुधागड तालुक्यातील भेलिव येथील मृगगड येथे श्रमदान मोहिमांचे आयोजन करण्यात येते. दुर्गप्रेमींनी या मोहिमेत गडावरील पाण्याचं टाक साफ केलं.

पाली (जि. रायगड) - दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गेली दोन वर्ष सुधागड तालुक्यातील भेलिव येथील मृगगड येथे श्रमदान मोहिमांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच मृगगडावर श्रमदान मोहीमेद्वारे रणरणत्या उन्हात साफसफाई करण्यात आली.

दुर्गप्रेमींनी या मोहिमेत गडावरील पाण्याचं टाक साफ केलं. पावसाळ्याच्या आधी पाण्याच्या टाक्यांमध्ये झाडांचा पालापाचोळा पडून तशाच टाक्यात राहतो. पावसाळ्यात पाण्यामध्ये पाला पाण्यात साचून राहिल्यामुळे कुजतो आणि त्यामुळे पाणीही खराब होते. टाके साफ करून पाणी जास्त वेळ चांगलं राहावं व येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते पाणी पिण्यासाठी वापरता यावे, हा यामागील उद्देश आहे. असे दुर्गवीरचे सदस्य विजय लोके यांनी 'सकाळ'ला सांगितले. या मोहिमेत सचिन रेडेकर, अर्जुन दळवी, सचिन जगताप, विवेकानंद दळवी, निलेश जाधव, रवी दासम, वैभव सावंत, अमित मेंगळे, सुरज येरुळकर, राकेश मोरे आदी दुर्गवीर स्वयंसेवक सहभागी झाले होते. 

गडसंवर्धन हा एकच ध्यास -
दुर्गवीर प्रतिष्ठान सन 2008 पासून महाराष्ट्रातील दुर्लक्षित गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करत आहे. दुर्गवीरच्या शिलेदारांनी गडावरील पायवाटा स्वच्छ करणे, टाक्या साफ करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, दिशादर्शक व माहिती फलक लावणे अशा प्रकारची कामे आजवर पुर्णत्वास नेण्यात आलेली आहेत. 

श्रमदानासोबत गडाबाबात जनजागृती व गडाचा प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. गडाचे महत्व व इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन 'सकाळ'च्या माध्यमातून दुर्गवीर अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी केले आहे. 

शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी -
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातून पूढे आतमध्ये माणखोर्‍यातुन भेलिव गावालगत मृगगड हा किल्ला आहे. घाट ओलांडुन कोकणात येणार्‍या शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी शिवरायांना हा किल्ला महत्वाचा वाटला. या किल्यास भेलीवचा किल्ला असेही संबोधले जाते किल्यावर जाण्यास भेलीव गावाकडुन एक तास लागतो. मृगगडावरील बालेकिल्यावर चढण्यासाठी दगडाला खोदुन पायऱ्या केल्या आहेत. वर चढतांना उधळा किल्ला व मोराडीचा सुळका पहायला मिळतो. तसेच किल्यावर किल्लेदार व त्यांच्या सहकार्‍यांसाठी बांधलेल्या घरांचे अवशेष, दोन कोठारे याचबरोबर माथ्यावर पायऱ्यांची विहीर व तीन पाण्याची टाकी आहेत. पावसाळ्यात किल्यावर जाणे तसे कठीणच पण आजुबाजुचा निसर्ग मन ओढुन घेतो.

मृगगड संवर्धनासाठी पुढे या -
मृगगड संवर्धन व्हावा यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे सर्व संवर्धन व सामाजिक उपक्रम हे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय होतात. दानशुर व्यक्तींच्या छोट्या मोठ्या देणगीतून हे सर्व उपक्रम राबविले जातात. तुम्ही दिलेला एक रुपया सुद्धा चुकीच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची ग्वाही आमचे कार्यच तुम्हाला देईल असे दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे. दुर्गवीरच्या सर्व मोहीमांचे फोटो व माहिती मिळविण्यासाठी फेसबुक पेजला भेट द्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Shramadaan campaign at Mriggad By Durgaveer Group