डॉ. बाबासाहेबांची स्वाक्षरी मंगेशराव पेडणेकरांनी जपलीये ७३ वर्षे

डॉ. बाबासाहेबांची स्वाक्षरी मंगेशराव पेडणेकरांनी जपलीये ७३ वर्षे

सावंतवाडी - उमलत्या वयात बाबासाहेबांचा आदर्श वडिलांनी मनावर बिंबवलेला. त्यांचे कर्तृत्व शिखरावर असताना त्यांची झालेली भेट आणि स्वाक्षरी म्हणजे आयुष्यभराचा ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही स्वाक्षरी त्यांनी गेली ७३ वर्षे जिवापाड जपून ठेवलीय. वयाच्या ९२ व्या वर्षीही मंगेशराव पेडणेकरांच्या मनात बाबासाहेबांची झालेली भेट आजही तितकीच ताजी आहे.

मंगेशराव मूळचे बांद्याचे (जि. सिंधुदुर्ग). ते बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले. पत्नी अंजनीसह सध्या विरंगुळा म्हणून मुंबईतून नेरूरच्या आजोळ केंद्रात मुक्‍कामाला आहेत. या दाम्पत्याच्या सोबतीला आहे, ती डॉ. आंबेडकरांची स्वाक्षरी आणि त्यांनी दिलेला संदेश. ही स्वाक्षरी त्यांच्यासाठी आयुष्याची पुंजी असल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यावर जाणवते.

मंगेशरावांचे वडील नोकरीसाठी बांद्यातून मुंबईत गेले. कुटुंबही सोबत होते. तेव्हा ते परळला राहायचे. डॉ. आंबेडकरांचे वडील त्यांचे मित्र होते. यामुळे मंगेशरावांच्या वडिलांना डॉ. बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीचे कमालीचे कौतुक. ते आपल्या मुलांनाही बाबासाहेबांसारखे बनण्याची शिकवण द्यायचे. हाच आदर्श ऐकून मंगेशराव मोठे होत होते. त्यांना मोठ्या व्यक्‍तींच्या स्वाक्षरी आणि संदेश गोळा करण्याचा छंद होता.

बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला. यावेळी मंगेशराव परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये शिकायचे. याच भागात असलेल्या राजगृह बंगल्यावर डॉ. बाबासाहेब यायचे. मंगेशराव अभ्यास करण्यासाठी त्या काळात रात्रीच्या वेळी शाळेतच राहायचे. यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांची विशेष परवानगी घेतली होती. डॉ. बाबासाहेबांची स्वाक्षरी घ्यायची त्यांची प्रबळ इच्छा होती. एका रात्री ही संधी चालून आली. डॉ. बाबासाहेब योगायोगाने 
तिथेच आले होते.

या क्षणाची आठवण सांगताना मंगेशराव सांगतात, ‘‘डॉ. बाबासाहेब आलेत हे समजल्यावर मी वही घेऊन शाळेच्या वरच्या मजल्याकडे निघालो. जिन्यातच ते दिसले. ती तेजस्वी मूर्ती ७३ वर्षांनंतर आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पांढराशुभ्र पोशाख त्यांनी परिधान केला होता. मी त्यांच्यासमोर वही धरली आणि ‘काका, तुमची स्वाक्षरी आणि संदेश हवाय’ असे सांगितले.

यावर ‘अरे तू आता शाळेत कसा? शाळा तर कधीच सुटलीय’ असे त्यांनी विचारले. मग मी अभ्यास करायला शाळेतच मुक्‍कामाला राहत असल्याचे सांगितले. वडिलांचे त्यांच्या वडिलांशी असलेले स्नेहाचे नातेही सांगून टाकले. त्यांनी माझी वही हातात घेतली. छान स्वाक्षरी केली. त्यावर तारखेसह ‘बी ट्रू युवर सेल्फ’ असा संदेश दिला. ही भेट, ती स्वाक्षरी माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा झाली. आजही ती मी जपून ठेवलीय.’’ 

पेडणेकर म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेबांचा प्रभाव माझ्यावरच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबावर आहे. त्यांची, रमाबाई यांची भव्य अंत्ययात्रा आम्ही पाहिली. त्यांचे कर्तृत्व, लोकांचे मिळालेले प्रेम पाहिले. त्यांचा आदर्श घेऊन मी उच्च शिक्षण घेतले. माझी दोन्ही मुले पीएचडी झाली.’’

९२ व्या वर्षीही जगण्याचा आनंद
श्री. पेडणेकर ९२, तर त्यांच्या पत्नी अंजनी ९० वर्षांच्या आहेत. इतक्‍या वयातही त्यांची प्रकृती चांगली आहे. यासाठी त्यांनी प्राणायाम, आहार यांबरोबरच जगण्याची स्वतःची अशी शैली बनवली आहे. कधी मुंबईत, कधी बांद्यात; तर कधी आजोळमध्ये मन रमेल तिथे ते राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com