esakal | सिंधुदुर्ग : ग्रामीण भागांत ९.३४ टक्के दूषित पाणी । Water
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग : ग्रामीण भागांत ९.३४ टक्के दूषित पाणी

सिंधुदुर्ग : ग्रामीण भागांत ९.३४ टक्के दूषित पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण ९.३४ टक्के असून कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याबाबत वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनत असून जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी कुडाळ, दोडामार्ग, आणि कणकवली तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १४४५ पाणीनमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १३५ पाणी नमूने दूषित आढळले आहेत. याचे प्रमाण सरासरी ९.३४ टक्के एवढे आहे. शहरी भागातील तपासण्यात आलेल्या १०५ पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही.

हेही वाचा: पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे सरासरी प्रमाण ९.३४ टक्के एवढे असले तरी कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २०.८६ टक्के, कणकवली तालुक्यात १५.८९ टक्के तर दोडामार्ग तालुक्यात १४ .५५ टक्के दूषित पाणी असल्याचे सप्टेंबर अखेर तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्त्रोत दूषित होत असून हे स्त्रोत दूषित का होत आहेत यांचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत यांनी दिले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना महामारी या साथी बरोबरच दूषित पाण्यामुळे अन्य साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाकडून सर्व्हे करून दूषित पाणी स्त्रोतांचे तात्काळ शुद्धीकरण करुन घ्यावे. ज्या भागात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे अशा ग्रामपंचायतीना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.

हेही वाचा: महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आरोग्यावर परिणाम

जिल्ह्यात ग्रामीण भागात जल शुध्दीकरणासाठी गेल्या काही वर्षामध्ये यंत्रणा उभी करण्यात आली. तरीही दूषित पाण्याचा प्रश्न सुटताना दिसत नाही. विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीत याचे प्रमाण वाढते. टंचाई काळातही हे प्रमाण त्यापेक्षा जास्त असते. ठराविक तालुक्यात याची तीव्रता अधिक आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले असून ज्या भागात दूषित पाणी आढळून आले आहे. त्या संबंधित ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाणी होण्यामागचे कारण शोधून काढून त्यावर उपाय योजना करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत."- डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तालुकानिहाय पाण्याचे प्रमाण (टक्केवारी)

दोडामार्ग १४.५५

सावंतवाडी ५.३७

वेंगुर्ले १०.२७

कुडाळ २०.८६

मालवण ०.६५

कणकवली १५.८९

देवगड ००.००

वैभववाडी १२.५४.

loading image
go to top