बिगुल वाजलं; बॅंक निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा लागणार पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

बिगुल वाजलं; बॅंक निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा लागणार पणाला

सिंधुदुर्ग - गेले अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता 30 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर निवडणुकीची मतमोजणी 31 डिसेंबर रोजी होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी जाहीर केले आहे.

या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज आज 29 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने भाजपा व महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून महाविकास आघाडीसह शिवसेनेला या निवडणुकीत सत्ता मिळवणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता असताना, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गेले सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे. मात्र वारंवार निवडणुक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला ताणलेली असतानाच आता अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.