अखेर सिंधुदुर्गला मिळाले मेडिकल कॉलेज; मंत्रिमंडळाची मान्यता 

शिवप्रसाद देसाई 
Thursday, 15 October 2020

सिंधुदुर्गात आरोग्य सुविधांची वानवा आहे. हॉस्पिटल असली तरी तज्ञ डॉक्टर आणि विविध वैद्यकीय यंत्रणांचा अभाव आहे.

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्याचा शासन आदेश आज सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा आदेश खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक यांना सुपूर्त केला. हा विषय सकाळने गेल्या तीन वर्षांपासून लावून धरला होता.

सिंधुदुर्गात आरोग्य सुविधांची वानवा आहे. हॉस्पिटल असली तरी तज्ञ डॉक्टर आणि विविध वैद्यकीय यंत्रणांचा अभाव आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास एका छताखाली सुसज्ज रूग्णालय, तज्ञ, विविध लॅब उपलब्ध होतील, अशी संकल्पना सकाळने सर्वप्रथम मांडली. याचा पाठपुरावा केला. यानंतर या प्रश्‍नावर लढा देण्यासाठी कृती समिती स्थापन झाली. यातून जनरेटा सुरू झाला. सकाळने नेहमीच याला पाठबळ दिले. खासदार विनायक राऊत यांनी या प्रश्‍नासाठी बरेच प्रयत्न केले. यातून आज जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल मिळाला आहे. मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्याचा जीआर आज जारी झाला. जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी हे महाविद्यालय होणार आहे. यामुळे ते लवकर सुरू व्हायला कोणतीही अडचण येणार नाही.

हे पण वाचाएकनाथ खडसे आमचे नेते  ते पक्ष सोडणार नाहीत ;  चंद्रकांत पाटील 

गेले दोन दिवस यासाठी खासदार राऊत, आमदार केसरकर आणि आमदार नाईक प्रयत्न करत होते. आज सायंकाळी याचा जीआर आरोग्यमंत्री टोपे यांनी या तिघांकडेही सुपूर्त केला.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg got medical college