सिंधुदुर्ग : ‘रसाळ’ हापूसचा बदली फंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hapus mango

सिंधुदुर्ग : ‘रसाळ’ हापूसचा बदली फंडा

सिंधुदुर्ग : ‘सायबानं’ स्वतःची बदली इच्छित ठिकाणी करण्यासाठी अस्सल हापूसचा ‘रसाळ’ फंडा वापरायचा ठरवला. त्यासाठी आपल्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून २० पेट्या आंबे ‘वरिष्ठांना’ पोचविण्याचा घाट सुरुवातीला सायबानं घातला; पण रुपयाही खर्च न करण्याची प्रवृत्ती असणाऱ्या सायबानं ऐनवेळी हापूसला गावाकडे चांगला दर असल्याने आंबे चक्क विकले. बदलीच्या नावावर घेतलेल्या या आंबे विक्रीची ‘रसाळ’ चर्चा आज ‘सोम’वारच्या दिवशी जिल्हा मुख्यालयात चांगलीच रंगली.

त्याचे झाले असे ः या सायबांची पहिली पोस्टींग सिंधुदुर्गला होती. पहिल्या टर्मचे रसभरीत किस्से त्याकाळात गाजले होते. कोल्हापुरातून सिंधुदुर्गमध्ये बदली झाल्यावर यांनी सुरुवातीपासून सोमवारी दुपारी येणं आणि बुधवारी-गुरुवारी गावी जाणं असा आपला कार्यक्रम सुरू

ठेवला आहे.ठेकेदारांकडून काजू, कोकम या कोकणी रानमेव्यासोबतच मासे मिळवायचे आणि घरी पळायचे यासाठी गाडीच्या डिकीत दोन थर्माकोलच्या पेट्याही कायम मुक्कामाला ठेवल्या होत्या. पुढे जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रात बदली झाली. तिथेही कारनामे कायम राहिल्याने पुन्हा बदली सिंधुदुर्गात झाली. आता साहेबांची येथून पुन्हा बदलीसाठी फिल्डींग सुरू आहे. यासाठी कधी कोल्हापुरात, साताऱ्यात जावून मंत्रिमहोदयांना दौऱ्यात भेटून गाऱ्हाणं घातलं जावू लागलं. फारसं यश दृष्टीपटात न आल्यानं प्रशासकीय चॅनेलमधून प्रयत्न सुरु झाले. यासाठी अस्सल हापूसचा रसाळ मार्ग त्यांना अलिकडेच सुचला; पण हापूसचे दर जास्त आहेत. खिशातले पैसे खर्च करायचे त्यांच्या स्वभावात नाही. त्यासाठी आंब्याची बाग कुणाची आहे, त्याची शोधाशोध सुरू झाली.

डिकी भरली अन् गाडी निघाली सुसाट...

कार्यालयातील कंत्राटी असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बागेचा शोध लावल्यावर ‘सायबानं’ गुरुवारी थेट २० पेट्या आणून देण्याचा दम भरला. बिचारा कर्मचारी नोकरी टिकवण्यासाठी दुपारीच २० पेट्या हातोहात घेऊन आला. सायबाची डिकी आंब्याच्या पेट्यांनी भरली, तशी गाडी सुसाट इचलकरंजीच्या दिशेने निघाली. यातल्या काही पेट्या ‘वरिष्ठांना’ पोचवून बदलीसाठी मार्ग सुकर करण्याचा सुरुवातीचा विचार आता प्रवासात बदलला होता. गावातच ग्राहक मिळवून अस्सल बागेतला आंबा सायबानं खपवला. रोज सायबाच्या नाश्ता आणि जेवणाचं बिल भागवून वैतागलेले कर्मचारी आज सोमवारी कँटीनमध्ये बसून आंब्याच्या ‘रसाळ’ कथेची चर्चा करीत होते.

Web Title: Sindhudurg Hapus Mango Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top