esakal | सिंधुदुर्ग: खारेपाटण आणि आचिर्णे ही स्थानके प्रवाशांच्या सेवेसाठी सज्‍ज
sakal

बोलून बातमी शोधा

archirne

खारेपाटण आणि आचिर्णे स्थानके प्रवाशांच्या सेवेसाठी सज्‍ज

sakal_logo
By
राजेश सरकारे : सकाळ वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्गात नव्याने उभारण्यात आलेली खारेपाटण आणि आचिर्णे ही स्थानके प्रवाशांसाठी सेवेसाठी सज्‍ज झाली आहेत. उद्या (ता.७) दिवा एक्‍सप्रेस या स्थानकात थांबणार आहे. या स्थानकात प्रथमच थांबा मिळालेला दिवा एक्‍सप्रेसच्या स्वागतासाठी स्थानिकांनीही सज्‍जता केली आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग : भाजपचे जिल्ह्यात तब्बल ९१६ बुथ स्थापन

कोकण रेल्‍वेची उभारणी होत असतानाच खारेपाटण-चिंचवली येथे स्थानकाचा आराखड्यात समावेश झाला होता; मात्र निधी अभावी काही स्थानकांची उभारणी मागे पडली होती; मात्र खारेपाटण रेल्‍वे स्थानक संघर्ष समितीने त्‍यासाठी सातत्‍याने लढा दिला होता. त्‍यानंतर तत्‍कालीन रेल्‍वे मंत्री यांच्या पाठपुराव्यामुळे खारेपाटण-चिंचवली येथे रेल्‍वेस्थानक मंजूर झाले. रेल्‍वे गाड्यांच्या क्रॉसिंगमधील वेळ कमी व्हावा यासाठी कणकवली आणि वैभववाडी तालुक्‍यांच्या सीमेवर आचिर्णे येथेही नवे स्थानक उभारण्यात आले आहे.

खारेपाटण आणि आचिर्णे स्थानकांची उभारणी सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाली होती; मात्र कोरोना संसर्ग असल्‍याने या स्थानकांची रीतसर उद्‍घाटने झाली नव्हती. आता गणेशोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे बंद असलेली दिवा एक्‍सप्रेस गाडी ७ ते ३० सप्टेंबर या दरम्‍यान सुरू करण्यात आली आहे. या गाडीला नव्याने उभारणी झालेल्‍या खारेपाटण आणि आचिर्णे या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

हेही वाचा: आता शिवसेना गप बसणार नाही; उपजिल्हाप्रमुखांचा इशारा

उद्या (ता.७) सावंतवाडी ते दिवा जाणारी एक्‍सप्रेस आचिर्णे स्थानकात सकाळी ९.४३ वाजता दाखल होणार आहे. तर ही गाडी खारेपाटण स्थानकात सकाळी १०.०४ वाजता येणार आहे. या दोन्ही स्थानकात दिवा एक्‍सप्रेसचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. खारेपाटण स्थानकात येणाऱ्या एक्‍सप्रेसचे स्वागत खारेपाटण-चिंचवली रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने केले जाणार असल्‍याची माहिती समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी दिली.

या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह जिल्‍हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली

loading image
go to top