विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

बहुतांश ठिकाणचे चित्र - एक-दोनच पुस्तकांचे वितरण; शिक्षण विभागाचे भोंगळ नियोजन

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाच्या भोंगळ व नियोजनाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांना केवळ एक-दोन विषयाच्या पुस्तकाचे वितरण करून पुस्तक वितरणाचा सोपस्कार पूर्ण झाला. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले पुस्तकांचे संच गेले कुठे? असा प्रश्‍न पालकांतून विचारला जात आहे.

बहुतांश ठिकाणचे चित्र - एक-दोनच पुस्तकांचे वितरण; शिक्षण विभागाचे भोंगळ नियोजन

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाच्या भोंगळ व नियोजनाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांना केवळ एक-दोन विषयाच्या पुस्तकाचे वितरण करून पुस्तक वितरणाचा सोपस्कार पूर्ण झाला. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले पुस्तकांचे संच गेले कुठे? असा प्रश्‍न पालकांतून विचारला जात आहे.

शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाळांकडून विद्यार्थी पटाबाबत माहिती मागवून घेऊन त्यानुसार पाठ्यपुस्तकांचे संच पुरविले. जिल्हा स्तरावरून तालुका, गट स्तरावर वितरण होऊन प्रत्येक शाळेपर्यंत विद्यार्थी पटसंख्येनुसार पुस्तकांच्या संचाचे वितरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शिक्षण प्रशासनाकडून देण्यात येत असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार होते; मात्र काही ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वितरणाचा केवळ सोपस्कार पूर्ण झाला. प्रत्यक्षात काही विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांची पुस्तकेच देण्यात आली. शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी अन्य विषयांच्या पुस्तकांची प्रतीक्षाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही ग्रामीण भागातील शाळेचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४५५ शाळा असून नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या.

शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यासाठी सुमारे ६५९५२ पुस्तकांचे संच उपलब्ध झाले होते. सर्व पुस्तक संचाचे शाळास्तरावर वितरण करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही सर्व विषयांची पुस्तके मिळाली नसल्याचे समोर आले आहे. 

शिक्षण विभागाकडून ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी असा भेदभाव तर केला जात नाही ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुर्गम भागातील व ग्रामीण विद्यार्थ्यांनाच दरवर्षी शिक्षण विभागाच्या भोंगळ नियोजनाचा त्रास सोसावा लागत आहे. तरी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तत्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी पालकांतून होत आहे.

कुडाळ, मालवणला दोन विषयांची पुस्तके
कुडाळ, मालवण तालुक्‍यांतील काही शाळांतील विद्यार्थ्यांना केवळ एक-दोन विषयांची पुस्तके देण्यात आली आहेत. जर प्रत्येक वर्गासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या पुस्तकांचा संच उपलब्ध झाला असताना एक-दोन पुस्तकेच देण्यामागचे कारण काय? खरोखरंच शाळांपर्यंत पुस्तकांच संच पोचले काय? हा संशोधनाचा विषय बनला आहे. 
 

ग्रामीण भागात एकही पुस्तक नाही
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यासाठी सुमारे ६५ हजार ९५२ पुस्तकांचे संच उपलब्ध झाले असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला होता; प्रत्यक्षात ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही सर्व विषयांची पुस्तके मिळाली नाही.

Web Title: sindhudurg konkan news Students are deprived of textbooks