सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात पावसाची सरासरी ५४६ मिलिमीटर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

तालुकानिहाय पाऊस
तालुकानिहाय चोवीस तासांतील व कंसात आत्तापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा- दोडामार्ग-१ (६४६), सावंतवाडी-१० (५७८), वेंगुर्ले-१०.०१ (६६२.८३), कुडाळ-३५ (५०६), मालवण-६ (६०९), कणकवली-१४ (५४४), देवगड-२१ (५३७), वैभववाडी-२७ (२८६).

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १५.५० मिलिमीटर पाऊस पडला तर आतापर्यंत एकूण ५४६.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून पावसाने सुरवात केली असली तरी नदीनाल्यांना पूर, रस्त्यावर पाणी चढून वाहतूक बंद अशी स्थिती उद्‌भवण्यासारखा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे अनेक तालुक्‍यात अद्यापही पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पाण्याने भरलेल्या नाहीत. तलावही भरले नाहीत; मात्र जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात प्रत्येक तालुक्‍यात पाऊस बरसू लागला आहे. 

शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. रविवारचा दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ घरे व १ गोठा बाधीत होऊन सुमारे आठ लाखांहून अधिक नुकसान झाल्याची नोंद झाली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कंपनीकडून वीजपुरवठ्याला अडथळा ठरणारी झाडे, झाडाच्या फांद्या तोडण्याकडे  दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुकळवाड, पडवे, गावराई परिसरात अनेक ठिकाणी विजेचे पोल (खांब) गंजलेले आहेत. धोकादायक विजेचे खांब बदलण्याकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे. सुकळवाड बाजारपेठ येथील विजेचे खांब तर अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. केव्हाही अनर्थ घडू शकतो; मात्र यायकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्याच्या कडेला धोकादायक झाडे
जिल्ह्यातील राज्यमार्ग आणि ग्रामीण रस्त्यांच्या बाजूला अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत; मात्र ही झाडे हटविण्याची कार्यवाही होत नाही. सरळसोट व धोकादायक नसलेली झाडे तोडून जिल्हा प्रशासनाकडून रस्ते ओसाड केले जात आहेत; मात्र वेडीवाकडी वाढलेली रस्त्यावर झुकलेली धोकादायक झाडे तोडून रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित करण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे.

Web Title: Sindhudurg Nagari rain