सिंधुदुर्गात भांडवली गुंतवणुकीची गरज- जठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मंत्री चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी सभा
येथील नगरपंचायत निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता मालवण, वेंगुर्ले व रात्री सावंतवाडीतील मतदारांच्या गाठीभेटी घेतील. सावंतवाडी येथे त्यांचा मुक्‍काम असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.

देवगड ः यापूर्वी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असताना नेत्यांना सिंधुदुर्गचा विकास साधता आला नाही. सिंधुदुर्गला आता भावनिक राजकारणापेक्षा भांडवली गुंतवणुकीची खरी गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही पालिकांसह देवगड -जामसंडे नगरपंचायतीमध्ये जनतेने भाजपला साथ देण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज जामसंडे येथे पत्रकार परिषदेत केले.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जामसंडे येथील पक्ष कार्यालयात श्री. जठार बोलत होते. या वेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम आदी उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, ""जिल्ह्यात भाजपच्या प्रचारात प्रगती आहे. नियोजन व सांघिक एकजुटीमुळे जिल्ह्यात भाजप पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल, असा विश्‍वास आहे. जिल्हा विकासामध्ये भावनिक राजकारणापेक्षा भांडवली गुंतवणुकीची आज गरज आहे. इतक्‍या वर्षांत कॉंग्रेसला संधी असूनही काही विकास साधता आला नाही. त्यामुळे आता जेथे भाजप व शिवसेनेची युती आहे अशा ठिकाणी युतीला व जेथे भाजप स्वतंत्र आहे तेथे भाजपला मतदारांनी संधी द्यावी.
नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने येथील विकास करणे सोपे जाईल. त्यासाठी मतदारांनी आमच्या पाठीशी राहावे. अन्यथा पालिका, नगरपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता आल्यास पुन्हा पाच वर्षे विकासासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच भांडवली गुंतवणुकीचा ओघ मतदारांनी अजमावण्यासाठी भाजपला संधी द्यावी.''

मंत्री चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी सभा
येथील नगरपंचायत निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता मालवण, वेंगुर्ले व रात्री सावंतवाडीतील मतदारांच्या गाठीभेटी घेतील. सावंतवाडी येथे त्यांचा मुक्‍काम असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.

Web Title: sindhudurg needs investments