मांगवलीत बारा गुरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

वैभववाडी - बारा गुरे वाहतूक करणारा टेम्पो मांगवली येथे ग्रामस्थांनी पकडला. टेम्पोसह गुरे ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणारा चालक महेंद्र वसंत लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैभववाडी - बारा गुरे वाहतूक करणारा टेम्पो मांगवली येथे ग्रामस्थांनी पकडला. टेम्पोसह गुरे ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणारा चालक महेंद्र वसंत लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी जिल्ह्यातील युवा नेत्याने प्रयत्न केले. यामध्ये तालुक्‍यातील नवनिर्वाचित सरपंच आघाडीवर होता. त्याची चर्चा आता सध्या तालुक्‍यात सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्‍यातून बेकायदा गुरे वाहतूक सुरू आहे. वर्षभरात गुरे वाहतूक करणारे टेम्पो पकडून देण्याचे प्रकार सुरू असले तरी बेकायदा वाहतूक थांबलेली नाही. दरम्यान, कोळपे येथे आयशर टेम्पोमध्ये बारा गुरे भरून कोल्हापुरच्या दिशेने घेऊन जाणारा टेम्पो (एमएच. ०९ सीए ८५३३) मांगवली येथील ग्रामस्थांनी मांगवली तिठा येथे पकडला. टेम्पोमध्ये बारा बैल होते. ग्रामस्थांनी टेम्पोचालक लोकरे याच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांना संशय आल्यामुळे त्यांनी टेम्पोमध्ये पाहिले असता गुरे भरल्याचे दिसून आले.

ग्रामस्थांनी तत्काळ वैभववाडी पोलीसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही पोलीस घटनास्थळी पोचले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात टेम्पो आणि टेम्पोचालकाला गुरांसह दिले. टेम्पोचालक महेंद्र लोकरे यांच्या वाहतूक परवाना नव्हता. याशिवाय तो बेकायदा गुरे वाहतूक करीत असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; परंतु गुन्ह्यात वापरलेला टेम्पो पोलिसांनी तत्काळ सोडून दिला. याशिवाय टेम्पोतील गुरेही मालकांच्या ताब्यात दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मांगवलीतील ग्रामस्थांनी गुरे पकडल्याचे समजताच हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यामध्ये एक नवनिर्वाचित सरपंच आणि त्याचे कार्यकर्ते आघाडीवर होते. जिल्ह्यातील एका युवा नेत्यानेही प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या स्थानिक कार्यकर्त्यालाही पोलिस स्थानकात प्रकरण मिटविण्याकरीता पाठविल्याची चर्चा होती. गुरांचा टेम्पो पकडून देणारे आणि प्रकरण मिटविण्यासाठी आग्रही असणारा युवा नेता एकाच पक्षाचे असल्यामुळे या प्रकरणावरून त्यांची जुंपण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गुन्ह्यातील टेम्पो का सोडला ?
चालकांकडे वाहतूक परवाना नसताना गुरांची अवैद्यरीत्या वाहतूक करताना ग्रामस्थांनी पकडल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले; परंतु एका साध्या जबाबावर चालक आणि टेम्पो सोडून देण्यात आले. त्यामुळे गुन्ह्यात वापरला जाणारा टेम्पो का सोडला? अशी चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे.

Web Title: Sindhudurg News 12 cows escapes