"देवगड हापूस'चे मानांकन लांबणीवर - अजित गोगटे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

देवगड - देवगड हापूसला पेटंट (जी. आय.) मानांकन मिळण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवगड हापूसचा दर्जा, वैशिष्टे व गुणवत्ता याचे वेगळेपण सांगणाऱ्या अहवालावर सुनावणी झाल्यानंतर मानांकन मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला रत्नागिरी येथील एका बागायतदाराने हरकत घेतल्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

देवगड - देवगड हापूसला पेटंट (जी. आय.) मानांकन मिळण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवगड हापूसचा दर्जा, वैशिष्टे व गुणवत्ता याचे वेगळेपण सांगणाऱ्या अहवालावर सुनावणी झाल्यानंतर मानांकन मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला रत्नागिरी येथील एका बागायतदाराने हरकत घेतल्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तालुक्‍यातील आंबा बागायतदारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया असल्याची माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी आज जामसंडे येथे पत्रकार परिषदेत दिली. 

संस्था कार्यालयात ऍड. गोगटे यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. या वेळी देवगड तालुका आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष पु. ज. ओगले, उपाध्यक्ष डी. बी. बलवान, राजेंद्र शेट्ये, सदाशिव भुजबळ आदी उपस्थित होते. 

श्री. गोगटे म्हणाले, ""निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला हरकत घेतली गेल्यामुळे बागायतदार नाराज आहेत. देवगड आणि रत्नागिरी आंब्याला मिळणाऱ्या "जीआय' मानांकनाला विरोध दर्शवला आहे. सर्व ठिकाणचा हापूस एकच असून, देवगड, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्यामध्ये काहीच फरक नाही, असा अजब कांगावा याचिकाकर्त्याने केला आहे. त्यामुळे "देवगड हापूस' आणि "रत्नागिरी हापूस' या दोन्ही आंब्यांना मान्य झालेल्या जी.आय. मानांकनाला परत खीळ बसली आहे. 2008 पासून प्रलंबित असलेल्या मानांकन प्रकरणामध्ये एप्रिल 2017 मध्ये झालेल्या अखेरच्या सुनावणीत देवगड व रत्नागिरी हापूसला स्वतंत्र मानांकन देण्याचे जीआय रजिस्ट्रीने मान्य केले होते. तसा अध्यादेश काढण्याबाबतची रितसर जाहिरात त्यांनी काढली होती. त्यानुसार 23 जूनला देवगडच्या अर्जाला प्रसिध्दी देण्यात आली. त्यानंतर याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास त्या पुढील चार महिन्यांत नोंदवायच्या होत्या, मात्र हरकतीची मुदत संपण्याच्या अखेरीसच रत्नागिरी येथील एका प्रगतिशील बागायतदाराने चेन्नई येथील मानांकन बोर्डाकडे आपली हरकत नोंदवल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. हरकतीमध्ये त्यांनी रत्नागिरीबरोबरच देवगड हापूसच्या प्रस्तावालाही हरकत घेतल्याने येथील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी हापूस मानांकनाबाबत त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्यांनी रत्नागिरीपुरती हरकत नोंदवणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता त्यांनी देवगड हापूसलाही हरकत घेतल्याने कोकणातील आंबा बागायतदारच अडचणीत सापडला आहे. हा कोकणातील बागायतदारांचा विश्‍वासघात असून, त्याचा बागायतदार निषेध व्यक्‍त करीत आहेत. 

ते म्हणाले, ""कोकणातील सर्व आंबा एकाच ब्रॅंडखाली आणण्याच्या प्रयत्नाला येथून विरोध होता. कोकणपासून कर्नाटकपर्यंत सर्वच आंबा एकच असल्याचे म्हटल्यास देवगड हापूसचे वेगळेपण राहणार नाही. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने मानांकन मिळणे महत्त्वाचे आहे. देवगड हापूसचे बाजारात प्रस्तापित नाव असल्यामुळे तसेच त्याच्या एकूणच गुणधर्माचा विचार करता देवगड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळू शकते, ही बाब तज्ज्ञांसोबत झालेल्या चर्चेत पुढे आल्यानंतरच याबाबत पुढे पाऊल उचलण्यात आले होते. त्याला यश आले असताना आता हरकतीमुळे ते लांबणीवर पडले आहे.'' 

आंब्यामध्ये देवगड हापूसचे वेगळेपण असल्यामुळे तसेच ग्राहकांकडून त्याला पहिल्या पसंतीची मागणी असल्यामुळे हापूसला पेटंट (जी. आय.) मानांकन मिळाले पाहिजे, असा संस्थेचा आग्रह आहे. मानांकनामुळे देवगडच्या नावाखाली होणाऱ्या अन्य ठिकाणच्या आंबा विक्रीला लगाम घालण्याची ताकद येथील शेतकऱ्याला मिळेल. त्यामुळे घेतलेल्या हरकतीवर वेळीच सुनावणी घेऊन मानांकन मिळण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी आपण करणार आहे. 
अजित गोगटे, अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था. 

Web Title: Sindhudurg News Ajit Gogate Press