केसरकर, नाईक, राऊत यांनी विकासावर बोलावे - अंकुश जाधव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सिंधुदुर्गनगरी - लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले दीपक केसरकर, वैभव नाईक आणि विनायक राऊत हे विकास करण्यात कमी पडले आहेत. या त्रिकुटाने माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर बोलण्यापेक्षा आपण केलेल्या विकासावर बोलावे,’ अशी टीका माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली.

सिंधुदुर्गनगरी - लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले दीपक केसरकर, वैभव नाईक आणि विनायक राऊत हे विकास करण्यात कमी पडले आहेत. या त्रिकुटाने माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर बोलण्यापेक्षा आपण केलेल्या विकासावर बोलावे,’ अशी टीका माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली.

त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अपघाताने आमदार झालेल्या वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करु नये. मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते पुन्हा मंत्री या कार्यकाळात राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा आलेख नेहमी चढता ठेवला होता; परंतु लाटेत खासदार झालेले विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे सत्तेच्या माध्यमातून जनतेचा विकास करण्यास कमी पडलेले आहे. 

या त्रिकुटांनी राणे यांच्यावर बोलण्यापेक्षा विकासकामावर बोलावे. आमदार नाईक हे अपघाताने विधानसभेवर गेले आहे. त्यांची आमदारकी म्हणजे ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ अशी टीका जाधव यांनी यातून केली.
आमदार नाईक यांनी राणे यांच्यावर केलेल्या टिकेला जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले. 

यात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री असून सुद्धा जनतेची काम होत नाहीत. आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवून राणे यांच्या नावाचे खडे फोडायचे आणि जनतेचा लक्ष विचलीत करण्याची कुटनिती शिवसेनेची मंडळी वापरत आहे. चिपी विमानतळ, आडाळी एमआयडीसी, मालवण येथील सी वर्ल्ड हे मोठे प्रकल्प का वेळेत पूर्ण करु शकले नाहीत याची उत्तरे द्यावी लागणार म्हणून टिका करुन राणेंना लक्ष करायचा हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे, असेही यात म्हटले आहे.

मंत्रिमंडळात समावेशाची चिंता करू नका...
‘चांदा ते बांदा’ योजनेचा पालकमंत्री आणि मंडळी नेहमी गवगवा करतात; परंतु प्रत्यक्षात याचा कितपत फायदा जनतेला झाला याचे उत्तर आजही अनुत्तरित आहे. राणेंचा मंत्रिमंडळात कधी समावेश होणार याची काळजी नाईक व इतर मंडळींनी करू नये. कारण राणे मंत्री झाले तर आपले जिल्ह्यात काही चालणार नाही. आपले अस्तित्व धोक्‍यात येणार याची भीती राऊत, केसरकर, नाईक यांना आहे. त्यामुळे ही मंडळी जिल्ह्याच्या विकासावर बोलण्यापेक्षा राणे परिवारावर जास्त बोलतात.

Web Title: Sindhudurg News Ankush Jadhav comment