‘धारेश्‍वर’ हायस्कूलचे ॲड. दळवी गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

दोडामार्ग - घोटगे येथून घरी परतत असताना गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आलेले ॲड. अनिल दळवी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना बांबुळी (गोवा) येथे दाखल करण्यात आले. ॲड. दळवी त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता आणि धारेश्‍वर विद्यालयातील शिक्षक अशोक देसाई यांच्यावर शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री हल्ला झाला होता.

दोडामार्ग - घोटगे येथून घरी परतत असताना गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आलेले ॲड. अनिल दळवी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना बांबुळी (गोवा) येथे दाखल करण्यात आले. ॲड. दळवी त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता आणि धारेश्‍वर विद्यालयातील शिक्षक अशोक देसाई यांच्यावर शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री हल्ला झाला होता.

शाळेशी संबंधित वाद आणि शिक्षण क्षेत्रातील एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढल्यामुळे हा हल्ला झाल्याची तक्रार सौ. दळवी यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून अकरा जणांची नावे दिली असून अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सौ. दळवी यांनी संताप व्यक्त केला.

सिंधुदुर्गनगरी येथून ॲड. दळवी, सौ. दळवी, देसाई वाहनातून घोटगेत जात होते. घराच्या थोडे अलीकडे धारेश्‍वर माध्यमिक विद्यालयाजवळ टेंबवाडी येथे त्यांची सुमो अडविण्यात आली. त्यासाठी हल्लेखोरांनी रस्त्यात साडी आडवी बांधली होती आणि रस्त्यात झाडही आडवे टाकले होते. ॲड. दळवी यांनी गाडी थांबवताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या मागील, पुढील आणि अन्य काचा फोडल्या. तिघांच्याही डोळ्यांत मिरचीपूड फेकून लोखंडी सळ्या, लाकडी दांडे यांनी गाडीच्या काचा फोडून बेदम मारहाण केली. त्यात तिघेही जखमी झाले. 

श्री धारेश्‍वर माध्यमिक विद्यालय आणि शाळेचे आजी माजी शिक्षक यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. ॲड. दळवी त्या विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर सौ. दळवी विद्यालयाच्या मुख्याध्यापक आहेत. श्री. देसाई शाळेचे शिक्षक आहेत. या प्रकरणी सौ. दळवी यांनी अकरा जणांची संशयित म्हणून पोलिसात नावे दिली आहेत. हा वाद शाळेशी संबंिधत असल्याचा दावा त्यांनी तक्रारीतून केला आहे.

दरम्यान, तिघांनाही वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र ॲड. दळवी यांची मंगळवारी (ता. १३) पुन्हा अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव करीत आहेत. त्या अकराही जणांविरोधात गुन्हा दाखल आहे आणि तपास सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

एकत्र येण्याचे आवाहन...
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात झगडणाऱ्या आम्हा पती-पत्नीवर दोषींकडून सिनेमा स्टाईलने जीवघेणा हल्ला होतो, ही गांभीर्याची गोष्ट आहे. जे आमच्या बाबतीत घडले ते उद्या तुमच्याही बाबतीत घडू शकते. त्यामुळे अशा हिंसक आणि गुंड प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी पुढे या, आम्हाला साथ द्या, असे आवाहन धारेश्‍वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता दळवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोडामार्गवासीयांना केले आहे. मारहाणीत आपले पती आणि श्री सातेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल दळवी यांच्या पोटातून रक्तस्राव होत असल्याने आणि अनेक ठिकाणी हाडे फ्रॅक्‍चर झाल्याने बांबोळीतील गोमेकॉमध्ये दाखल केल्याचे सांगून सौ. दळवी यांनी शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या गुंडगिरी विरोधात तालुकावासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Sindhudurg News attack on Ad. Dalvi