ओटवणेत बॅंक फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी- ओटवणे येथील बॅंक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा चोरट्याने अयशस्वी प्रयत्न केला. सीसीटीव्हीची सुरक्षा भेदत चोरटे थेट तिजोरीपर्यंत पोचला; मात्र तिजोरी फोडता न आल्यामुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

सावंतवाडी- ओटवणे येथील बॅंक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा चोरट्याने अयशस्वी प्रयत्न केला. सीसीटीव्हीची सुरक्षा भेदत चोरटे थेट तिजोरीपर्यंत पोचला; मात्र तिजोरी फोडता न आल्यामुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

चोरीत काही चोरीला गेले नाही; मात्र चोरट्याने ग्रील आणि अन्य वस्तूचे नुकसान केले आहे, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी -  ओटवणे येथे मंदिराच्या जवळ बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. त्या ठिकाणी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने लाकडाच्या वाश्‍याच्या सहाय्याने बॅंक इमारतीच्या खिडकीचे ग्रील उखडले व आत प्रवेश केला. यानंतर तिजोरी ठेवलेल्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. खोलीत तिजोरीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही असूनसुद्धा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला नाही. त्याने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरट्याला ती उघडता आली नाही. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.

बॅंक कर्मचारी शनिवारी सकाळी बॅंकेत आले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिस ठाण्यात वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. येथील पोलिस ठाण्यात या प्रकाराची नोंद आहे. पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, अरुण जाधव, अमित गोटे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Sindhudurg News attempt of Bank robbery