झोळंबेत साकव कोसळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

दोडामार्ग - झोळंबे लिंगाची तळी येथील साकव दुरूस्तीसाठी निधी न मिळाल्याने अखेर आज सकाळी कोसळला. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी निधीसाठी वारंवार मागणी केली होती. पाठपुरावा करूनही निधी मंजूर न झाल्याने अखेर साकवाने मान टाकली.

दोडामार्ग - झोळंबे लिंगाची तळी येथील साकव दुरूस्तीसाठी निधी न मिळाल्याने अखेर आज सकाळी कोसळला. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी निधीसाठी वारंवार मागणी केली होती. पाठपुरावा करूनही निधी मंजूर न झाल्याने अखेर साकवाने मान टाकली.

तेथील तळीवर महिला दररोज पिण्याचे पाणी आणायला जातात. साकव कोसळला तेव्हा महिला नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. तो साकव पंधरा वर्षांपूर्वी सावंतवाडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आला होता; मात्र तो योग्य खात्याकडे वर्ग न झाल्याचे कारण दाखवले जात असल्याने निधी देता येत नसल्याचा तांत्रिक मुद्दा पुढे केला जात आहे.
माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री. गवस, तत्कालिन सरपंच सतीश कामत गेली दोन वर्षे दुरुस्तीसाठी पाठपुरावा करत होते; पण त्यांच्या मागणी व पाठपुराव्यांची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली नाही.

श्री. गवस यांनी लोखंडी खांबांचा टेकू देऊन तात्पुरती उपाययोजना केली होती. तरीही धोक्‍याची टांगती तलवार ग्रामस्थांच्या डोक्‍यावर कायम होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा नियोजन समितीकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला. निधीची मागणी केली; पण प्रशासनाकडून त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली.

गवस यांनी व्यक्त केली वेदना 
आराखड्यात असूनही अखेरच्या क्षणी नियोजनकडून प्रस्ताव डावलले जातात याचे शल्य गणेशप्रसाद गवस यांना आहे. त्याबद्दल श्री. गवस यांनी तीव्र संताप व्यक्त करुन आता योग्य निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेची फळ का मम तपाला
पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हा विकास नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर श्री. गवस त्यांचे खंदे समर्थक आहेत. तरीही साकवाचा प्रस्ताव दोन वर्षे होऊनही मंजूर होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट प्रश्‍न जरी पालकमंत्र्यांना केला नसला तरी गावाच्या प्रश्‍नासाठी झटणाऱ्या गवस यांच्या मनात हेची फळ काय मम तपाला असा प्रश्‍न नक्कीच आला असेल.

Web Title: Sindhudurg News Bridge breakage in Zholambet