देवबाग मार्गावर ‘कॅन्व्हास मिरर’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मालवण - देवबाग येथील वाढत्या पर्यटनाला एकमेव असलेला अरुंद रस्ता नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यटकांना पर्यटन हंगामात तासन्‌तास नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी देवबाग ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडीवर अनोखा पर्याय उपलब्ध केला आहे.

मालवण - देवबाग येथील वाढत्या पर्यटनाला एकमेव असलेला अरुंद रस्ता नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यटकांना पर्यटन हंगामात तासन्‌तास नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी देवबाग ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडीवर अनोखा पर्याय उपलब्ध केला आहे.

शासनाच्या निर्मल सागर तट अभियानांतर्गत ग्रामसेवक युवराज चव्हाण यांच्या पुढाकारातून तारकर्ली-देवबाग मार्गावर दहा ठिकाणच्या धोकादायक व अरुंद ठिकाणी कॅनव्हास मिरर बसविण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात देवबाग येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

तारकर्लीपासून देवबाग हे सहा किलोमीटरच्या अंतरावर अरुंद रस्त्याची समस्या गेली कित्येक वर्षे कायम आहे. मालवणहून देवबागला जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकमेव मार्ग आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे वाहनचालकातून समाधान व्यक्त होत आहे.

अरुंद रस्ता अडथळ्याचा...
देवबाग संगमपर्यतच्या गावाच्या निमुळत्या भागाला जोडणारा मार्गावर अनेक अवघड वळणे असून अरुंद रस्ता असल्याने नेहमीच पर्यटक तसेच वाहनचालकांना वाहन चालविणे जिकरीचे बनले होते. गावाच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला कर्ली खाडी असून मध्येच लोकवस्ती व त्यामधून अरुंद रस्ता. त्यामुळे रस्ता रुंदीकरण होणे कठीण बाब असताना ग्रामपंचायतीने या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कॅनव्हास मिररचा प्रयोग केला आहे.

देवबाग ग्रामपंचायतीने निर्मल सागर तट अभियानांतर्गत  कॅनव्हास मिरर उपलब्ध करून दिले आहे. या ‘मिरर’चे उद्‌घाटन काशिनाथ केळुसकर व रमेश कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच तमास फर्नांडिस, नवनिर्वाचित सरपंच जान्हवी खोबरेकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी अजित टोपणो, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, मनोज खोबरेकर, भानुदास येरागी, रमेश कद्रेकर, बंदर अधिकारी अनंत गोसावी उपस्थित होते. बहिर्गोल आरसे वाहतुकीसाठी चालकांना उपयुक्त असते. या मिररमुळे वाहने कशी जात आहेत याची माहिती समोरील वाहनचालकांना मिळते. या मिररमुळे वाहन चालकाला डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूंना पाहता येणार आहे.

Web Title: Sindhudurg News 'Canvas Mirror' on Deobag Road