अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर काजू उत्पादन

शिवप्रसाद देसाई, अजय सावंत
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

केंद्रीय अर्थसंकल्पात काजू बियांवरील आयात शुल्क कमी केल्याने कोकणातील काजू उद्योगाला दिलासा मिळाला आहे. यामुळे बारमाही काजू प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे; मात्र स्थानिक काजूचा दर गेल्या वर्षीएवढा टिकून राहणार का, याबाबत शंका आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात काजू बियांवरील आयात शुल्क कमी केल्याने कोकणातील काजू उद्योगाला दिलासा मिळाला आहे. यामुळे बारमाही काजू प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे; मात्र स्थानिक काजूचा दर गेल्या वर्षीएवढा टिकून राहणार का, याबाबत शंका आहे. काजू व्यवसायातील मालाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे हे क्षेत्र परदेशी चलन मिळविण्याची क्षमता असूनही अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर कायमच झुलताना दिसते. आयात-निर्यात धोरणापेक्षाही काजूकडे बागायतदारांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून प्रतिहेक्‍टरी उत्पन्नवाढ करण्यावर भर देण्याची गरज आजही ठळक आहे.

काजूचा उदय
गोवा, केरळ या ठिकाणी साधारण साडेचारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी काजूची लागवड सुरू केली. हा काजू ब्राझीलमधून येथे आणला गेला. पूर्व आफ्रिकेत केनिया, मोझंबीक अशा देशांत आपल्यापेक्षा मुबलक प्रमाणात पूर्वीपासून आहे. काजू हे मूळ पोर्तुगीज नाव आहे. डोंगर उताराची होणारी धूप रोखण्यासाठी काजू येथे आणला गेला.

काजूचे व्यावसायिक रूप
गोव्यातून काजूचे क्षेत्र कोकणापर्यंत पोचले. आगमनानंतर बराच काळ काजू दुर्लक्षित होता. स्थानिक पातळीवर त्याचा वापर व्हायचा. व्यावसायिक वापर नसला तरी याचा विस्तार रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यापासून कारवार, केरळपर्यंत पसरत गेला. याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप १९१७ ला वेंगुर्लेतील दाजीबा ऊर्फ शंकर बाळकृष्ण तोरणे यांनी दिले. त्यांनी पहिला काजू प्रक्रिया कारखाना सुरू केला. त्या पाठोपाठ मालवणात महादेव बापू झांट्ये यांनी कारखाना उभारला. त्या काळात लाल सालाचा काजूगर प्रक्रिया करून काढला जाई. काजू बी उन्हात लाल होईपर्यंत वाळवून ती फोडली जात असे. वेंगुर्ले, मालवणमधील या काजूला मुंबई आणि कराची ही मुख्य बाजारपेठ होती.

काजू बागायतदारांचा या पिकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन अधिक व्यावसायिक व्हायला हवा. कोकण कृषी विद्यापीठाने काजूमध्ये चांगल्या जाती विकसित केल्या आहेत. विद्यापीठाने ठरवून दिलेले कृषी धोरण अवलंबल्यास काजूचे स्थानिक उत्पन्नच बऱ्यापैकी वाढेल. आपल्याकडील प्रतिहेक्‍टरी उत्पादन क्षमता वाढवायलाही संधी आहे.
- डॉ. राकेश गजभिये,
काजू पीक तज्ज्ञ

काजूची परदेश वारी
त्या काळात वेंगुर्ले येथील सेंट लुक्‍स हॉस्पिटल संपूर्ण कोकणात प्रसिद्ध होते. तेथे मूळ अमेरिकेतील डॉ. गोहिन हे कार्यरत होते. १९२१-२२ दरम्यान त्यांना वेंगुर्लेतील काजू कारखान्यामधील काजूगर खायला मिळाला. तो त्यांना खूप आवडला. न्यूयॉर्क (अमेरिका) मधील बाजारपेठ या ड्रायफुटला मिळू शकते, असे त्यांनी श्री. तोरणे यांना सुचविले. डॉ. गोहिन यांचे पुत्र रिचर्ड गोहिन यांनीही तेथील बाजारपेठेचा अंदाज घेऊन काजूगराला मार्केट मिळेल, असे सांगितले. त्या काळात काजूची व्यावसायिक लागवड झाली नाही. तोरणे यांना आपल्या एका मित्राकरवी मोंबासो या देशामध्ये काजू बी स्वस्त असल्याची माहिती मिळाली. त्यांनी १९२३-२४ च्या दरम्यान समुद्रमार्गे मोंबासोमधून २४ हजार पोती काजू आयात केली. काजू क्षेत्रातील बीची ही पहिली आयात. तोरणेंनी काजूगर न्यूयॉर्कला पाठविला; मात्र समुद्रमार्गे तो पोचायला ४० ते ४५ दिवस लागले. तोपर्यंत हा माल खराब झाला होता. तोरणे यांचे पुत्र राजाराम तोरणे त्यावेळी काजूगर विक्री पाहण्यासाठी अमेरिकेत गेले. काजू व्यापारासाठी परदेशात गेलेले ते पहिले व्यावसायिक ठरले. पुढे श्री. तोरण व श्री. झांट्ये यांनी काजूगर टिकविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यानंतर महादेव बापू प्रभूझाट्ये १९२८ मध्ये दुसऱ्यांदा काजूगर निर्यातीचा यशस्वी प्रयोग केला. नंतरच्या काळात काजूच्या परदेश व्यापाराने अनेक चढउतार पाहिले; मात्र काजूला मागणी वाढत गेली. यामुळे डॉलर कमविणारे पीक अशी ओळख काजूने निर्माण केली.

पूर्वी आयात शुल्कामुळे पाच टक्के जादा द्यावे लागायचे. ते शुल्क कमी केल्यामुळे शेवटचे चार महिने बंद पडणारा काजू प्रक्रिया उद्योग सुरू ठेवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अधिक प्रभावीपणे मिळविता येणार आहे. यामुळे आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. 
- रोहन बोवलेकर,
काजू प्रक्रिया उद्योजक

प्रक्रिया उद्योगाचा पसारा
सिंधुदुर्गातून सुरू झालेला काजू प्रक्रिया उद्योग नंतर गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, गुजरात या भागात पसरला. जेथे काजूचे उत्पादन होत नाही तेथेही प्रक्रिया उद्योग सुरू झाले. ड्रम रोस्टेडसारखे नवे तंत्रज्ञान विकसित केले गेल. काजू प्रक्रियेसाठी अधिक क्षमतेची यंत्रसामग्री बनवली गेली. काजूला मागणीही वाढू लागली. यामुळे काजू लागवडीखालील क्षेत्र वाढूनही कच्चा माल कमी पडू लागला. देशात उत्पादित होणारी काजू बी आठ ते साडेआठ लाख टन आणि कच्च्या काजूची गरज साडेसतरा ते १९ लाख टन असे व्यस्त प्रमाण निर्माण झाले. यामुळे पुन्हा एकदा काजू बी आयातीची गरज ठळक बनली.

आयात-निर्यातीचा प्रवास

महाराष्ट्रात साधारण २२०० च्या दरम्यान काजू प्रक्रिया कारखाने आहेत. यात छोट्या कारखान्यांची संख्या साधारण १७०० आहे. आपल्याकडील काजू उत्पादन मात्र या कारखान्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के इतकेच आहे. यामुळे काजू प्रक्रिया वर्षभर चालविणे कठीण बनते. त्यामुळे शेवटचे चार ते पाच महिने आयात काजूवरच कारखाने चालवावे लागतात.

आफ्रिकन देशामधून ही आयात होत असे. साधारण दोन वर्षांपूर्वी काजू बी वरील आयात शुल्क शून्यावरून पाच टक्‍क्‍यापर्यंत वाढविण्यात आले. यामुळे आयात काजू बी चा दर वाढला. साहजिकच कारखानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये स्थानिक काजू बी खरेदीसाठी स्पर्धा वाढली. यातून ६० रुपये प्रतिकिलो असलेली स्थानिक काजू बी १२० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचली. यामुळे गेल्यावर्षी काजू लागवडीखाली येणारे क्षेत्र अचानक वाढले.

जिल्ह्यात २०१२ ते २०१६ या कालावधीत आंबा लागवडीखालील क्षेत्र हे २१८ हेक्‍टर इतके आहे. तर काजू लागवडीखालील क्षेत्र १ हजार ८७ हेक्‍टर इतके आहे. यावर्षी सुद्धा काजूची विक्रमी लागवड झाली आहे. कारखानदार मात्र या सगळ्या प्रवासात अडचणीत आले. बाराही महिने कारखाना चालविणे कठीण बनले. यातील गुंतवणूक वाढली. तयार काजूच्या दरात मोठी वाढ झाली. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला.

 मान्यताप्राप्त काजू
कोकणातील काजूला जगभरातून मागणी असते. पिवळसर रंगाचा हा काजू अतिशय चवदार असतो. आफ्रिकन देशामधून आयात काजू आकाराने थोडा मोठा आणि पांढरा शुभ्र असतो; मात्र त्याची चव कोकणातील काजूपेक्षा निराळी असते. यामुळेच आता काजू कोकणातील म्हणून विकल्यास इथल्या मालाच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती काही अभ्यासकांना वाटते. देवगड हापूस आणि कर्नाटक हापूस याची जशी विचित्र स्पर्धा सुरू आहे तशीच स्थिती काजूबाबत होईल, अशी भीतीही त्यांना वाटते.

भविष्यात आयातीस मर्यादा
आफ्रिकन देशामध्ये काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. इतकी वर्षे तेथे काजूवर प्रक्रिया होत नसे. यामुळे कमी दरात काजू उपलब्ध व्हायचा. गेल्या दोन-तीन वर्षांत तेथे काजू प्रक्रिया उद्योग झपाट्याने वाढू लागले आहे. भविष्यात हे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणात वाढून तेथून होणाऱ्या निर्यातील मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील उत्पादन क्षमतेला आवश्‍यक कच्चा माल तयार करण्याची क्षमता आपल्याला करावीच लागणार आहे.

आयात शुल्कात घट
अशी स्थिती असली तरी कारखानदारांना केंद्राने या अर्थसंकल्पात काहीसा दिलासा दिला आहे. पाच टक्‍क्‍यावर असलेले काजू बीचे आयात शुल्क अडीच टक्‍क्‍यावर आणले. तशी मागणी कारखानदारांकडून बराच काळ सुरू होती. यामुळे परदेशी काजूच्या किमतीत थोडी घट होणार आहे. यामुळे बारमाही काजू प्रक्रिया उद्योग चालविणे शक्‍य होणार आहे. याचा स्थानिक काजूच्या दरावर परिणाम होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काजू बागायतदार मात्र साशंक आहेत.

क्षमता वाढीची गरज
आपल्याकडे काजू उत्पादन दुपटीने वाढविणे आवश्‍यक आहे. अजूनही आपल्याकडी पडीक जमिनीचे क्षेत्र जास्त आहे. त्यात लागवडीबरोबरच उपलब्ध काजू क्षेत्राची क्षमता वाढविणेही आवश्‍यक आहे. आपल्याकडे सध्या काजूची उत्पादन क्षमता हेक्‍टरी दीड टन इतकी आहे. कृषी मानकांचा योग्य वापर केल्यास ही क्षमता अडीच टनापर्यंत जाऊ शकते. तसे झाल्यास आहे या क्षेत्रातही बऱ्यापैकी उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी बागायतदारांनी काजूकडे अधिक व्यावसायिक नजरेने पाहायला हवे.
 

Web Title: Sindhudurg News Cashew nut Production Big Special Story