‘उत्कर्षा’मधून मुलींचा सर्वांगीण विकास

प्रभाकर धुरी
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

किशोरवयीन मुलींचा बचत गट हा सिंधुदुर्गने केलेला राज्यातील पहिला वेगळा प्रयोग आहे, तर मासिक पाळी व्यवस्थापनासंदर्भातील किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याचा उत्कर्षा उपक्रम हा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचा ‘डीम प्रोजेक्‍ट’ आहे.

दोडामार्ग -  ‘उत्कर्षा’ आणि बचत गटांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचा आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किशोरवयीन मुलींचा बचत गट हा सिंधुदुर्गने केलेला राज्यातील पहिला वेगळा प्रयोग आहे, तर मासिक पाळी व्यवस्थापनासंदर्भातील किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याचा उत्कर्षा उपक्रम हा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचा ‘डीम प्रोजेक्‍ट’ आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प, प्राथमिक, माध्यमिक शाळा ‘उत्कर्षा’च्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत आहेत. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या आधी शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. मासिक पाळीच्या आधी आणि मासिक पाळीदरम्यान पोटात, ओटीपोटात दुखण्याचे प्रमाणही काही मुलींमध्ये आढळते. शिवाय मासिक पाळीबाबत समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. ते दूर करून मुलींमध्ये मासिक पाळीबाबत शास्त्रशुद्ध माहिती पोचविण्याचे काम उत्कर्षाच्या माध्यमातून केले जाते. त्यासाठी जिल्हास्तरावर खास प्रशिक्षणे आयोजित करून किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत माहिती देणाऱ्यांना प्रशिक्षित दिले आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरात चांगल्याप्रकारे उत्कर्षा उपक्रम सुरु आहे.

किशोरवयीन मुलींना मासिक पाळी नैसर्गिक आहे हे सांगून त्या काळात होणारे शारीरिक, मानसिक बदल याबाबत माहिती दिली जाते. तसेच त्या काळात घ्यावयाची आरोग्याची काळजी, शारीरिक स्वच्छता याबाबतही मार्गदर्शन केले जाते. त्यातून गैरसमज आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे उत्कर्षा उपक्रमाच्या अमलबजावणीमध्ये जिल्ह्यातील अनेक महिला बचतगटही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी किशोरवयीन मुलींचे बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. सुरवातीला त्यांच्या बचतगटांची पासबुके बॅंकांऐवजी पोस्टात खोलण्यात आली होती. तालुक्‍यात घोटगेवाडी, मोरगाव आणि अन्य काही गावांमध्येही किशोरवयीन मुलींचे बचतगट स्थापन करण्यात आले आहेत.

मुलींमध्ये बचतगट जागृती...
मोरगाव येथील अंगणवाडी ताई आणि गृहलक्ष्मी महिला स्वयंसाह्यता बचतगटाच्या अध्यक्ष सौ. हेमलता नाईक यांनी आपल्याकडे किशोरवयीन मुलींचे बचतगट स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. त्यांना बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच मासिक पाळी व्यवस्थापनाबाबतही प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे सांगितले. एकूण काय तर उत्कर्षा आणि बचतगटांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचा आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास साधून त्यांनाही सक्षम बनविण्यासाठी चळवळ उभी करण्यात आल्याचे दिसते.

Web Title: SIndhudurg News CEO Shekhar Singh Dream Project