मसाला व्यापारी चमण सोलंकी यांचा नाण्यांचा खजिना

अमोल टेंबकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सावंतवाडी - मुघलांसह इंग्रजांच्या काळातील इतिहास सांगणारी साडेचार हजारहून अधिक नाणी आणि दीड हजारहून अधिक जुन्या नोटा, नाणी येथील मसाले व्यावसायिक चमण सोलंकी यांनी जमविली आहेत. यात नोटा आणि नाण्यांसह टपाल तिकीट आणि बॉण्डपेपरचा समावेश आहे.

सावंतवाडी - मुघलांसह इंग्रजांच्या काळातील इतिहास सांगणारी साडेचार हजारहून अधिक नाणी आणि दीड हजारहून अधिक जुन्या नोटा, नाणी येथील मसाले व्यावसायिक चमण सोलंकी यांनी जमविली आहेत. यात नोटा आणि नाण्यांसह टपाल तिकीट आणि बॉण्डपेपरचा समावेश आहे.

मुळ गुजरात रायबरेली येथील सोलंकी कुटुंब गेली अनेक वर्षे सावंतवाडीत स्थायिक झाले आहेत. ते आता सिंधुदुर्गाचेच झाले आहेत. गेली अनेक वर्षे ते सावंतवाडीसह जिल्ह्यातील आसपासच्या गावांतील आठवडा बाजारात मसाल्याचा व्यवसाय करतात. या काळात सोलंकी यांना व्यवसाय करीत असताना काही जुन्या नोटा मिळायला लागल्या आणि तोच त्यांचा छंद झाला.

छंद म्हणून हे सर्व जोपासत गेलो आणि आता मोठा संग्रह झाला. येणाऱ्या पिढीला इतिहासातील नाण्यांची ओळख व्हावी म्हणून प्रदर्शन घेण्याची तयारी आहे,

- चमण सोलंकी

 

सुरवातीला ते घरातच नाणी आणि नोटा जमा करून ठेवत. कालांतराने आठवडा बाजारात सोळंकींच्या संग्रहाची माहिती सर्वांना झाली. त्यामुळे  अनेकजण स्वतःकडील एखाद दुसरे दुर्मिळ नाणी, नोटा, टपालाची तिकीट अशा वस्तू त्यांना देवू लागले आणि त्यांचा संचय वाढत गेला.

सावंतवाडीत व्यवसायानिमित्त आल्यानंतर हा छंद जोपासला. हा ठेवा तरुण पिढीला बघता यावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी प्रदर्शन भरवुन माहिती देण्याची माझी तयारी आहे. गेली २० वर्षे मी हा संग्रह केला आहे. त्यात माझ्या आईवडीलांसह मुलांनी, मित्रांनी मदत केली. माझ्या कार्याची दखल घेवून गुजराज कॉईन सोसायटीकडुन मला नाणी तसेच नोटा जमा करण्यासाठी आवश्‍यक असलेले ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा मला अधिक फायदा झाला.
- चमण सोलंकी 

आज त्यांच्याकडे तब्बल साडेचार हजारहुन अधिक नाणी आहेत. यात मुुघलकालीन, शिवाजी महाराजांच्या काळातील तसेच त्यानंतर झालेल्या अनेक घराण्यांच्या राजवटीसोबत इंग्रजांच्या काळातील नोटांचा समावेश आहे. तब्बल २७ हून अधिक देशाची टपाल तिकीट आहेत. त्याच बरोबर जुन्या काळाचे बॉण्डपेपर आहेत. येणाऱ्या भावी पिढीला आपला इतिहास कळेल त्यासाठी त्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. 

प्रदर्शन भरवू 
याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, ‘‘मसाला व्यावसायिकाने असा संग्रह करणे कौतुकास्पद आहे. त्यांची इच्छा नक्कीच प्रत्यक्षात उतरविली जाईल. त्यासाठी पालिकेकडून आयोजित कार्यक्रमात त्यांच्याकडे असलेल्या नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल.’’

Web Title: Sindhudurg News Chaman Solanki Coins collection