विवाह सोहळ्यात अनिष्ट पायंड्यांचा ‘आहेर’

एकनाथ पवार
बुधवार, 16 मे 2018

गेल्या काही वर्षात विवाह सोहळ्याचे स्वरूप पुरतेच बदलून गेले आहे. नवरा-नवरी बघण्याचा कार्यक्रम कालबाह्य झाला आहे. उपवर वधू-वरांना हळद लावताना आणि लग्न झाल्यानंतर महिलांकडून गायली जाणारी गाणीही क्वचितच ऐकायला मिळत आहेत. उपवर वधू-वरांच्या अंगाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाचे तर विद्रुपीकरण झाले आहे.

वैभववाडी - तळकोकणात सध्या लग्नसराईची धूम आहे. लग्न म्हणजेच दोन जीवांना एकत्र आणणारा पवित्र सोहळा; पण सिंधुदुर्गातील लग्नाच्या प्रथा परंपरांत काही वर्षांत खूप बदल झाले आहेत. काही अनिष्ट पायंडे या सोहळ्याशी जोडले आहेत.
सिंधुदुर्गातील पारंपरिक विवाह सोहळा हा आजतागायत अन्य भागांतील लोकांसाठी औत्सुक्‍य, कुतुहलचा विषय ठरायचा. नवरा, नवरी बघण्याच्या कार्यक्रमातील विचारले जाणारे प्रश्‍न, साखरपुडा, हळदीच्या कार्यक्रमातील महिलांकडून गायली जाणारी गाणी, पुण्यवचन, लग्नातील विधी, पारंपरिक वाद्यावरील वरात अशा पद्धतीचे विवाहाचे स्वरूप होते; परंतु गेल्या काही वर्षात विवाह सोहळ्याचे स्वरूप पुरतेच बदलून गेले आहे. नवरा-नवरी बघण्याचा कार्यक्रम कालबाह्य झाला आहे. उपवर वधू-वरांना हळद लावताना आणि लग्न झाल्यानंतर महिलांकडून गायली जाणारी गाणीही क्वचितच ऐकायला मिळत आहेत. उपवर वधू-वरांच्या अंगाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाचे तर विद्रुपीकरण झाले आहे. कार्यक्रमात आता मटण, चिकनची मेजवानी आणि डीजेच्या तालावर दारू पिऊन रंगढंगात थिबकणारी तरुणाई जिल्ह्याच्या काही भागात दिसत आहे.

लग्नाचा मुहूर्ताकडेही गांभीर्याने पािहले जात नाही. लग्न लागल्यानंतर नवरानवरीला उचलून घेण्याची किळसवाणी पद्धत रूढ होत आहे. यात बऱ्याचदा नवरीमुलगी आपल्या हातातील हार नवऱ्यांच्या गळ्यात फेकल्याचे प्रकार घडतात. लग्नातील सनई, चौघडा, ढोल ताशाची जागा बॅन्जोने आणि डीजेने घेतली आहे. लग्नातील वरात तर डीजेच्या तालावर वेगवेगळे अंगविक्षेप करून नाचणाऱ्या तरुणाईमुळे कौतुकापेक्षा बदनामच जास्त झाली आहे. वरात सूर्यास्तापूर्वी घरात आणण्याची प्रथा इतिहासजमा झाली आहे.

सध्या काही ठिकाणी लग्नसोहळ्यांत अनिष्ट प्रथा घुसल्या आहेत. हळद, तुळस, अगदी मंडपात लावण्यात येणाऱ्या आंब्याच्या झाडाची फांदी धार्मिक मानली जात असली तरी त्याला वैज्ञानिक आधार आहे. प्रत्येक विधीला महत्त्व आहे, हे विसरता कामा नये.
- प्रमोद करंबेळकर
पुरोहित नाधवडे

अनिष्ट प्रथा खर्चिक, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत. त्या रोखणे आवश्‍यक आहेत.
- राजाराम वळंजू,
निवृत्त सैनिक, खांबाळे

काय झालेत बदल ?
पूर्वी                                         आता
नवरा-नवरी बघणे                      हा कार्यक्रम कालबाह्य 
हळद हा धार्मीक विधी      हळदीला दारू, मटन पार्टी, डीजेचा वापर
सनई, चौघडा, ढोल, ताशा बाज    बेन्जोचा वापर,डीजे धुडगुस,
मुहुर्ताच्या वेळचे पालन    वेळ गांभीर्याने घेतली जात नाही
सुर्यास्तापुर्वी वरात घालण्याची पद्धत    सुर्यास्तानतंरच वरातील सुरूवात
 

 

 

Web Title: Sindhudurg News change in Marriage festival