शाळेच्या वेळतील बदलावरून मालवणमध्ये पालक - संस्था चालकात वाद

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 7 मे 2018

मालवण - शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बदलण्यात आलेल्या वेळेमुळे आज वाद निर्माण झाला. प्रशालेची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी करत उपस्थित पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. यात संस्थेची बाजू मांडण्यास आलेल्या एका पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्यामुळे पालक संतप्त बनले.

मालवण - शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बदलण्यात आलेल्या वेळेमुळे आज वाद निर्माण झाला. प्रशालेची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी करत उपस्थित पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. यात संस्थेची बाजू मांडण्यास आलेल्या एका पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्यामुळे पालक संतप्त बनले.

येत्या दोन दिवसात संबंधित पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्याची माफी न मागितल्यास विद्यार्थ्यांचे सर्व दाखले शाळेतून काढू असा इशारा यावेळी पालकांनी दिला.

दरम्यान, प्रशालेने बदललेल्या वेळेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी दहा वाजता धुरीवाडा येथील साईमंदिरात पालकांची बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. 

येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वेळ सकाळी ७.५० ते १.30 असा आहे. मात्र ही वेळ संस्थेने अचानक बदलताना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सकाळी १०.४० ते ४.३० अशी केली. या बदललेल्या वेळेची माहिती विद्यार्थ्यांच्या निकालपत्रातून एका छोट्या कागदावरून देण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची वेळ बदलण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यासंदर्भात पालकांनी प्रशालेशी संपर्क साधला असता संस्था पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आज सकाळी प्रशालेत बोलाविण्यात आले. प्रत्यक्षात या बैठकीस एकही संस्था पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने पालक संतप्त बनले. त्यानंतर तब्बल दोन तासांनी प्रशालेत आलेल्या एका पदाधिकार्‍याला पालकांनी शाळेची वेळ का बदलली अशी विचारणा करून ती पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी अशी मागणी केली.

आम्हाला हा निर्णय मान्य नसल्याने आम्ही मुलांचे दाखले मागितले असता ते दिले जात नसल्याचे पालकांनी सांगितले. यावर आम्ही तुम्हाला सांगितले नव्हते या शाळेत मुलांना घाला असे वक्तव्य त्या पदाधिकार्‍याने केल्याने पालक संतप्त बनले. पालकांचा संताप पाहून त्या पदाधिकार्‍याने तेथून काढता पाय घेतला.

प्रशालेने शाळेचा वेळ बदलताना पालकांना विश्‍वासात घेतले नाही. बदललेल्या वेळेला सहाशेपैकी साडे पाचशे पालकांचा विरोध आहे. प्रशालेने बदललेल्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांचे मोठे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताची नसणारी वेळ ठरवून शाळा कसला सर्वांगीण विकास साधणार असा संतप्त सवाल पालकांनी केला.

मनमानीपणे संस्थेने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळेची वेळ ठेवावी तसेच आमचा अवमान करणार्‍या त्या पदाधिकार्‍याने येत्या दोन दिवसात माफी मागावी अन्यथा सर्व विद्यार्थ्यांचे दाखले शाळेतून काढू असा इशारा पालकांनी दिला. यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधणार असल्याचे पालकांनी सांगितले. यावेळी पूर्णानंद सरमळकर, सुधीर बांदेकर, सूरज गवंडी, शमिका गावकर यांच्यासह अन्य पालक उपस्थित होते.

१९ मे नंतर निर्णय देऊ - सुदेश मयेकर

प्रशालेच्या बदललेल्या वेळेसंदर्भात संस्था पदाधिकार्‍यांची बैठक १९ मे रोजी होणार आहे. यात जो निर्णय घेतला जाईल तो सर्व पालकांना कळविला जाईल असे संस्था पदाधिकारी सुदेश मयेकर यांनी सांगितले.

 

                                                               

Web Title: Sindhudurg News change in school timing