#Agricrisis नारळाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

कडावल - हिर्लोक पंचक्रोशीतील गावांमध्ये माकडांकडून नारळ फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

कडावल - हिर्लोक पंचक्रोशीतील गावांमध्ये माकडांकडून नारळ फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

हिर्लोक पंचक्रोशीतील परिसर हा डोंगराळ व अति दूर्गम असल्याने येथील शेतकऱ्यांना विविध वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. वन्य प्राण्यांकडून येथील शेती बागायतींचे सातत्याने नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच थांबवले आहे. परिणामी परिसरात पडिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर वन्य प्राण्यांबरोबरच माकडांकडून सातत्याने होणाऱ्या नुकसानामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

माकडांकडून भातशेतीपासून नाचणी तसेच भाजीपाला पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच ही माकडे नारळ फळांची तर अतोनात हानी करत आहेत. माकडे कळपाने नारळ बागेत घुसतात व फळांची मोठ्या नासधूस करतात. अनेकदा कोवळी नारळ फळे खाली टाकतात. त्यामुळे मोठी आर्थिक हानी होते. हल्ली माकडांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.

माकडांकडून नारळ फळांचे नुकसान झाल्यास शासनाकडून प्रति नग अतिशय अल्प नुकसान भरपाई दिली जाते; मात्र प्रत्यक्षात नारळ फळाची किंमत २५ ते ३० रूपयांपर्यत असल्याने होणारे नुकसान व मिळणारी नुकसान भरपाई, यात बरीच तफावत दिसून येते.

बाजारभावाच्या तुलनेत भरपाई आवश्‍यक
शेतकऱ्यांना नारळाच्या बाजारभावाच्या तुलनेने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. माकडांकडून नारळ पिकाचे सातत्याने नुकसान होत असल्याने येथील शेतकरी मेटाकूटीला आले असून, होणाऱ्या नुकसानीची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी  होत आहे.

Web Title: Sindhudurg News coconut production issue