बांधकाम परवाना प्लॅन आता ऑनलाईन

अमोल टेंबकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सावंतवाडी - इमारत बांधकाम करताना परवानगीसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे सादर करण्यात येणारे कागदी प्लॅन आता इतिहासजमा होणार आहेत. त्यासाठी शासनाकडून महावास्तू हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत ॲटो कॅड ड्रॉईंग असलेले प्लॅन ऑनलाईन सादर करावे लागणार आहेत.

सावंतवाडी - इमारत बांधकाम करताना परवानगीसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे सादर करण्यात येणारे कागदी प्लॅन आता इतिहासजमा होणार आहेत. त्यासाठी शासनाकडून महावास्तू हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत ॲटो कॅड ड्रॉईंग असलेले प्लॅन ऑनलाईन सादर करावे लागणार आहेत.

बांधकाम विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सेवा मिळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या तीनही पालिकांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित पालिकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी महावास्तू हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारत बांधकामाचे प्रस्ताव ऑनलाईन देण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य माणसाचे काम करणारा इंजिनिअर, आर्किटेक्‍ट महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यांनीच ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असून आवश्‍यक त्या परवानग्या मिळविण्यासाठी ॲटो कॅड ड्रॉईंग असलेला इमारत बांधकामाच्या परवानगीसाठी अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती संबंधित कार्यक्रम अधिकारी सागर भालेराव यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘सावंतवाडीसह वेंगुर्ले आणि मालवण या तीन पालिकांत ही योजना राबविण्यात येणार आहे. आता कागदाचा नकाशा आणि प्लान गायब होणार आहे.. ऑनलाईन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्यामुळे संबंधित व्यक्तीचे काम तत्काळ पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यापुर्वी बांधकामची परवागनी मिळण्यास महिन्याभरापेक्षा जास्त वेळ लागत होता; मात्र आता नव्या प्रणालीमुळे पंधरा दिवसात संबंधिताला बांधकामची परवानगी मिळणार आहे; मात्र प्रस्तावादरम्यान काही कागदपत्रे अपुरी राहिल्यास किंवा कागद चुकल्यास प्रस्ताव पुन्हा करावा लागणार आहे.’’

प्रशिक्षणास सुरुवात
मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहरात सुध्दा ही प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपसुकच कामात सुसूत्रता येणार आहे. त्या दृष्टीने इंजिनिअर बिल्डर आणि आर्किटेक्‍ट लोकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रस्ताव देण्याची जबाबदारी याच लोकांकडे देण्यात येणार असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास होणार नाही.’’

Web Title: Sindhudurg News Construction License Plan Now Online