गैरहजर कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडी पालिका हैराण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सावंतवाडी - येथील पालिकेचे तब्बल 52 कर्मचारी अनधिकृतरीत्या गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलेली भूमिका चुकीची असल्यामुळे 24 तासांत हजर राहा, अशा आदेशासोबत त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

सावंतवाडी - येथील पालिकेचे तब्बल 52 कर्मचारी अनधिकृतरीत्या गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलेली भूमिका चुकीची असल्यामुळे 24 तासांत हजर राहा, अशा आदेशासोबत त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

प्रशासनाच्या मनमानीविरोधात येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह आरोग्य सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर या तिघांनी नाराजी व्यक्त करीत पालिकेतून बाहेर पडणे पसंत केले होते. जोपर्यंत सुसूत्रता येत नाही तोपर्यंत पालिकेत पाय ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. 

या पार्श्‍वभूमीवर आज पालिकेत जोरदार खलबते रंगली. यात प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 52 कर्मचाऱ्यांनी फक्त अर्ज टाकून सुट्या घेतल्याचे पुढे आहे. या प्रकाराला संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांनी माहिती दिली.

या पार्श्‍वभूमीवर आज कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक झाली. रजेवरील कर्मचाऱ्यांना चोवीस तासांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी जाऊन येथील "गुरूकुल'मध्ये नगराध्यक्ष साळगावकरांची भेट घेतली.

यावेळी झाल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली. "तुम्ही पुन्हा पालिकेत या. आम्ही तत्काळ कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर, परविन शेख, देविदास आडारकर, नीलेश तळवणेकर, डुमिंग डिसोझा, विजय बांदेकर आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल 
या प्रकाराची जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दखल घेतली. नगराध्यक्ष साळगावकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी माहिती घेतली. याबाबत आवश्‍यक त्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत, असे त्यांनी साळगावकर यांना सांगितले. 

Web Title: Sindhudurg News corporation labors absent issue in Sawantwadi