करुळ, भुईबावडा घाटातील प्रवास डेंजरस

एकनाथ पवार
सोमवार, 7 मे 2018

करुळ, भुईबावडा घाटात वाढलेली बेनामी ठेकेदारी, देखभाल दुरुस्ती नियोजनाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दरडी कोसळण्याचे धोके, खचणारे घाटरस्ते आणि घाटरस्त्यात होत असलेल्या निकृष्ट कामांमुळे रस्त्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहेत. अशातच मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणाऱ्या करुळ घाटाची पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती कोण करणार हेच निश्‍चित नाही. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या या घाटांतून सध्याचा प्रवास डेंजर बनला आहे.

सिंधुदुर्ग आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे करुळ आणि भुईबावडा हे दोन्ही घाटरस्ते धोकादायक बनले आहेत. दोन्हीकडे रस्त्यावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्‍यता आहे. करुळ घाटात दरडी कोसळतील, अशी पाच तर भुईबावडा घाटात सात ठिकाणे आहेत. रस्ता खचेल, अशी करुळ घाटात चार तर भुईबावडा घाटात दोन ठिकाणे आहेत. त्यामुळे हे दोन्ही घाटरस्ते पावसाळ्यात धोकादायक ठरणार आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाटरस्त्याची प्राथमिक दुरुस्ती व्हायला हवी. मात्र, अद्याप अशा कामांना हात लागलेला नाही. येथील गटारे दगड मातीने भरली आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येणार आहे. याशिवाय गेल्या पावसाळ्यात वाहून आलेले मातीचे ढिगारे अद्याप रस्त्यांच्या कडेला पडून आहेत.

घाटवाहतूक सुरक्षित होण्यासाठी येथे क्रॅश बॅरियर्स वापर केला जात असे. खचणाऱ्या घाटरस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी गॅबियन पद्धतीचा अवलंब केला होता. ही पद्धत काँक्रिटच्या संरक्षक भिंतीपेक्षा उपयुक्त आहे; मात्र त्या पद्धतीचा बांधकाम विभागाला विसर पडला आहे. खचलेले रस्ते बांधण्यासाठी काँक्रिटच्या भिंती उभारल्या जात आहेत. दरडी रोखण्यासाठी बोल्डर नेटचा वापर उपयुक्त ठरत आहे; पण पाच सहा वर्षांत एकाही धोकादायक ठिकाणी नेटचा वापर केलेला नाही.

बांधकामात गोलमाल

खचलेल्या घाटरस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी करुळ घाटात दोन कामांसाठी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला तर भुईबावडा घाटातील दोन कामांसाठी ५७ लाख रुपये मंजूर झाले. रस्त्याची पुनर्बांधणी काँक्रिटच्या भिंती उभारून करण्याच्या या कामांत ४ ते ५ इंचाचे १५ टक्के दगड वापरण्याची मुभा ठेकेदारांना होती; परंतु याचा गैरफायदा घेत ठेकेदारांनी दहा ते पंधरा इंचाचे ५० टक्‍क्‍यांहून अधिक दगड काँक्रिटमध्ये भरले आहेत. त्यामुळे तब्बल एक कोटी ४४ लाख रुपयेचा निधीचा दुरुपयोग झाला आहे. या कामांत दगड भरणा करतानाचा व्हिडिओही व्हायरला झाला होता. घाटरस्त्यातील कामांची निविदा प्रकिया राबवण्याचा केवळ फार्सच केला जातो, अशी चर्चा आहे.

बहुतेकदा नोंदणीकृत ठेकदारांकडून काम होतेच असे नाही, त्यामुळे अशा कामांच्या दर्जावरही प्रश्‍नचिन्ह उभे राहते. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या काही वर्षांपासून उपविभागीय पद दीड वर्षापासून तर शाखा अभियंत्याची मंजुर तिन्ही पदे रिक्तच आहेत.

दुरुस्ती नेमकी करणार कोण?

तळेरे-कोल्हापूर मार्ग १६६ जी राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. या मार्गावर करुळ घाट आहे. पावसाळ्यात घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे, दगड येणे असे प्रकार वारंवार घडता; परंतु हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम देखभाल दुरुस्ती करणार नाही; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्‍यक हस्तांतर आदेश केंद्राकडून प्राप्त नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही देखभाल-दुरुस्तीस असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे नेमके कोण काम करणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

तळेरे-कोल्हापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने करावी, असे पत्र आम्ही त्या विभागाला दिले होते; परंतु त्याबाबत हस्तांतर ऑर्डर मिळालेली नाही. हस्तांतर आदेशासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-पी. जी. तावडे, 

उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम, वैभववाडी

तळेरे-कोल्हापूर मार्गाची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण होण्याचा आदेश झाला की तातडीने देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होईल. हा आदेश तातडीने निघावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- विजय कांडगावे, 

कार्यकारी अभियंता, कोल्हापूर विभाग,

वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील करुळ घाटाची दुरवस्था झाली आहे त्यामुळे येथून वाहन चालवताना कसरत करावी लागते. दरीकडील बाजूस रिफ्लेक्‍टर नसल्याने रात्री येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
-सागर माईनकर,
वैभववाडी

Web Title: Sindhudurg News Danger zone in Karul, Bhuibavada Ghat